महत्त्वाचे पद न मिळाल्यामुळे सेनाची नाराजी

0
928

मुंबई, दि.३० (पीसीबी) – राष्ट्रपती भवनात गुरुवारी सायंकाळी सात वाजता होणार्‍या समारंभात ‘रालोआ’चे अध्यक्ष नरेंद्र मोदी हे सलग दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी यांच्यासोबत ‘रालोआ’चे ५० ते ६० जण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तथापि, सूत्रांच्या माहितीनुसार निवडक मंत्र्यांचा शपथविधी होईल व संसद अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची बुधवारी, सलग दुसर्‍या दिवशी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ रचनेवर बैठक झाली. ही बैठक चार तास चालली. जदयूचे नितीशकुमार यांनी अमित शहा यांची भेट घेतली. मंगळवारी अकाली दलाच्या हरसिमरत कौर, लोजपाचे रामविलास पासवान अणि युवा नेत्यांच्या नावांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबत मोदी आणि शहा यांची दीर्घकाळ बैठक झाली.

सूत्रांच्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळात काही विद्यमान दिग्गज मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आहे. जुन्या चेहर्‍यांना बाजूला करून किमान ४० टक्के नव्या चेहर्‍यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. लोजपाचे रामविलास पासवान आणि भाजपच्या काही जुन्या निष्ठावान नेत्यांना मंत्रिपद दिले जाणार आहे. ‘रालोआ’चे घटकपक्ष असलेली शिवसेना आणि जदयूच्या प्रत्येकी दोघांना मंत्री बनविले जाणार आहे. यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद असा समतोल साधला जाण्याची शक्यता आहे.

शपथविधीच्या कार्यक्रमात सर्वप्रथम राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ देतील. त्यानंतर इतर मंत्र्यांना पद व गोपनीयतेची ते शपथ देतील. केंद्रीय मंत्रिमंडळात किती मंत्र्यांच्या समावेश केला जाणार, तसेच कोणा नेत्याला कोणते खाते मिळणार, याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषत: महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपकडून तसेच शिवसेनेकडून कोणाकोणाचे भाग्य उजळणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सायंकाळी सात ते नऊ यावेळेत शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. सुमारे दोन ते अडीच तास हा कार्यक्रम चालणार असल्याने निवडक मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

हे राहतील जुनेजाणते चेहरे

मंत्रिमंडळाच्या संभाव्य चेहर्‍यांमध्ये राजनाथ सिंह, नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, थावरचंद गेहलोत, नरेंद्र तोमर, बाबुल सुप्रियो, श्रीपाद नाईक, महिलांमधून स्मृती इराणी, मेनका गांधी, निर्मला सीतारामन हे भाजपचे चेहरे राहतील. अकाली दलाकडून हरसिमरत कौर, लोकजनशक्ती पक्षाकडून रामविलास पासलान, रिपाइंकडून रामदास आठवले, अपना दलकडून अनुप्रिया पटेल, संयुक्त जनता दलाकडून राजीवरंजन सिंग, संतोष कुशवाह यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

भव्य सोहळ्याची तयारी

राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात सायंकाळी सात वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सोहळा गांभीर्यपूर्ण आणि भव्य स्वरूपात पार पाडावा, अशा सूचना राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळाल्याचे समारंभाची व्यवस्था पाहणार्‍या एका अधिकार्‍याने सांगितले. राष्ट्रपती भवनाचे मुख्य प्रवेशद्वार आणि मुख्य भवन यादरम्यान एक भव्य कॉरिडोर उभारण्यात आला असून, तेथे अतिथी देशांच्या प्रमुखांचे औपचारिक स्वागत करण्यात येणार आहे.

समारंभास ‘बीआयएमएसटीईसी’ देशांचे सर्व प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय देशोदेशीचे राजदूत, देशातील बुद्धिवादी, विचारवंत, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, सिनेअभिनेते यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय पक्षांचे प्रमुखदेखील हजर राहणार आहेत. खास करुन शपथविधी सोहळ्यास काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. विद्यमान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांना भेटणे टाळत आहेत. मात्र, ते  शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात भव्य व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली असून, तेथेच राष्ट्रपतींकडून पंतप्रधान व केंद्रीय मंत्र्यांना शपथ देण्यात येईल. व्यासपीठासमोर अतिथींच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.