मराठा समाजाच्या प्रतिनिधींना मातोश्रीवर बोलावून त्यांचा अपमान ; नितेश राणेंचा आरोप

0
654

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या प्रतिनिधींना मातोश्रीवर बोलावून त्यांचा अपमान केला, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. मराठा समाजाची गरज नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे नितेश राणे यांनी म्हटले असून आता याच मैदानात उद्धव ठाकरे यांना गरज आणि गाजर यामधील फरक दाखवतो, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. नितेश राणे ट्विटमध्ये म्हणतात, मराठा समाजाच्या प्रतिनिधींचा ‘मातोश्री’वर बोलावून अपमान केला गेला असे मला कळले. मला मराठ्यांची गरज नाही असे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यांचे मला समजले. आता याच मैदानात.. गरज आणि गाजरमध्ये फरक दाखवतो, असे त्यांनी म्हटले आहे.

नितेश राणे आणि त्यांचे बंधू नीलेश राणे हे सातत्याने शिवसेनेवर टीकास्त्र सोडत आहे. नीलेश राणे यांनी देखील एका ट्विटमध्ये संजय राऊत यांची अवस्था उद्धव ठाकरे यांनी गल्लीच्या कुत्र्यासारखी करून ठेवल्याचे म्हटले होते. तर नितेश राणे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी नाणारवरुन इशारा दिला होता. जे शिवसेनेला जैतापुरबद्दल जमले नाही, ते कोकणच्या जनतेने आणि आम्ही नाणारविषयी करुन दाखवले. परत आमच्या कोकणाकडे वाकड्या नजरेने पहाल तर याद राखा, असे त्यांनी म्हटले होते.