मराठा आरक्षणप्रश्नी पार्थ पवार सर्वोच्च न्यायालयात

0
242

मुंबई, दि. १ (पीसीबी) : मराठा आरक्षण प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची उडी घेतली आहे. आरक्षणप्रश्नी पार्थ पवार सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहेत. बीडमधील विवेक रहाडे या तरुणाच्या आत्महत्येनंतर पार्थ पवार यांनी ट्वीट केलं आणि मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचं सांगितलं. दरम्यान, पार्थ पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्या पुढे दोन पावले टाकत हे पाऊल उचलल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अप्रत्यक्षपणे थेट आजोबांनाच वारंवार आव्हान देण्याच्या पार्थ यांच्या भुमिकेमुळे पवार कुटुंबातील दुफळी कायम असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे.

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विवेकची बातमी ऐकून धक्का बसला. अशा दुर्दैवी घटनांची साखळी सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांना जागं व्हावं लागेल आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. हे संकट सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावलं उचलायला हवी.

पार्थ पवार यांचे ट्विट –

Devastated to hear of the tragic death of Vivek who committed suicide for the cause of Maratha reservations. Before a chain reaction of such unfortunate incident starts, Maratha leaders have to wake up & fight for this cause. Requesting Maha govt to step in to solve the crisis. — Parth Pawar (@parthajitpawar) 

विवेकने आपल्या मनात प्रज्वलित केलेली ज्योत संपूर्ण यंत्रणा पेटवू शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आलं आहे. मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. मी मराठा आंदोलनाची ज्वलंत मशाल घेण्यास तयार आहे. विवेक आणि इतर कोट्यवधी असहाय्य ‘विवेक’साठी न्यायाचं दार ठोठावण्यासाठी तयार आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या विवेक कल्याण रहाडे असं या 18 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. शेतकरी कुटुंबातील विवेक बारावीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. वैद्यकीय प्रवेशासाठी त्याने 15 दिवसांपूर्वी नीट परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी त्याने चांगली तयारी केली होती. पण पेपर कठीण गेल्याने या परीक्षेत चांगले गुण मिळतील की नाही? याची चिंता त्याला सतावत होती. या तणावातून त्याने बुधवारी (30 सप्टेंबर) दुपारी स्वत:च्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवेकने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली असून मृत्युपूर्वी त्याने तशा आशयाची चिट्ठी लिहून ठेवल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.

मराठा आरक्षणातील राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणखी एक बळी : विनायक मेटे
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीही विवेक रहाडेच्या आत्महत्येप्रकरणी राज्य सरकारला दोषी ठरवलं आहे. मराठा आरक्षणातील राज्य सरकारच्या नाकर्तेपणमुळे आणखी एक बळी गेल्याचं मेटे म्हणाले. त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून हा आरोप केला आहे. मेटे यांनी लिहिलं आहे की, “माझ्या बीड जिल्ह्यातील केतुरा या गावचा रहिवाशी असलेल्या मराठा समाजातील विवेक कल्याण रहाडे या १२ वी इयत्ता पास झालेल्या विद्यार्थ्याने नुकतीच नीटची परीक्षा दिली होती. मराठा समाजाच्या आरक्षण स्थगितीवरील निर्णय माहित झाल्याने काही दिवसांपासून विवेक नैराश्यग्रस्त असल्याचे त्याच्या कुटुंबीयाकडून कळले. रहाडे कुटुंबाच्या दुःखात शिवसंग्राम परिवार सहभागी आहे. राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या नाकर्तेपणामुळे आणखी एक बळी गेला आहे. मात्र आत्मबलिदान देणे हा पर्याय नसून समाजातील मुलामुलींनी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्या इतिहासात आपल्याला कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळालेली नाही तर तिच्यासाठी संघर्षच करावा लागला आहे. छत्रपती शिवरायांच्या शिकवणीप्रमाणे आपण एकोप्याने आरक्षणाची लढाई लढू अन पुन्हा जिंकूच मात्र आपल्या जीवाचे बरेवाईट करू नका हि हात जोडून विनंती….”