ममता बॅनर्जी मला वर्षाला दोन कुर्ते आणि बंगाली मिठाई पाठवतात – पंतप्रधान मोदी

0
722

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  मला अजूनही वर्षाला दोन कुर्ते आणि बंगाली मिठाई भेट म्हणून पाठवतात. तसेच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबतही माझे मैत्रीपूर्ण संबंध  आहेत, असे गुपित पंतप्रधान मोदी यांनी अभिनेता अक्षयकुमार यांनी घेतलेल्या मुलाखतीत उघड केले.    

या मुलाखतीत मोदी म्हणाले की, राजकारणातही माझे अनेक मित्र आहेत. विरोधी पक्षातील लोकांशीही माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.  बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देखील मला वर्षातून तीन ते चार वेळा ढाका येथून मिठाई पाठवतात. ही गोष्ट जेव्हा ममता बॅनर्जींना समजली, तेव्हापासून त्या देखील वर्षातून एक- दोनवेळा मिठाई पाठवू लागल्या आहेत,  असे त्यांनी सांगितले.

मोदी पुढे म्हणाले की, तरुणपणी मला सैन्यात भरती होण्याची खूप  इच्छा होती. लहानपणापासून मला वाचनाची आवड होती.  मी कधी पंतप्रधान होईन असे वाटलेही नव्हते. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो  आहे.  माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सामान्य अशी होती. त्यामुळे  मला एखादी नोकरी मिळाली असती आणि माझ्या आईने गावात साखर वाटली असती, असे मोदी यांनी सांगितले.