“मतदानाच्या दिवशी पाऊस, हा सासऱ्यांचा आशिर्वाद”

0
515

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली होती. आज सकाळी सात वाजल्यापासून अनेक नागरिकांनी तसेच कलाकारांनी मतदानाच हक्क बजावला आहे. महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कुटुंबाने सुद्धा लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी विलासराव देशमुख यांची सून अभिनेत्री जेनेलिया डिसूझा लातूरमध्ये पडणारा पाऊस हा सासऱ्यांचा आशिर्वाद असल्याचे म्हणाली.

अभिनेता रितेश देशमुखने पत्नी जेनेलिया आणि कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान एका वृत्त्वाहिनीशी बोलताना जेनेलियाने सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले. जेनेलियाला लातूरमध्ये पडत असलेल्या पावसाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने ‘लातूरमध्ये पडणारा पाऊस हा माझ्या सासऱ्यांचा आशिर्वाद आहे असे मला वाटते. हा खरंतर खूप चांगला दिवस आहे’ असे जेनेलिया म्हणाली.

जेनेलियाचे दोन्ही दीर धीरज देशमुख आणि अमित देशमुख लातूरमधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. धीरज देशमुख हे ग्रामीण लातूरमधून लढवत आहेत तर अमित देशमुख लातूर शहरामधून निवडणूक लढवत आहेत.