भोसरीतील तरुणाने दिड लाखांच्या खंडणीसाठी केला स्वत:च्या अपहरणाचा बणाव; तरुण ताब्यात

0
1496

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – वडिलांकडून दिड लाख रुपये उकळण्यासाठी एका तरुणाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव करुन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणण्यात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस पथक आणि खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे.

याप्रकरणी विनय राजेंद्र चव्हाण (वय २२, रा. गंधर्वनगरी, तापकीरनगर, मोशी) या तरुणाला ताब्यात घेण्यात आला आहे. त्याचे वडिल राजेंद्र किसन चव्हाण (वय ५३) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२८ नोव्हेंबर) सायंकाळी पावनेसहाच्या सुमारास विनय चव्हाण या तरुणाने घरातून निघून जाऊन स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला. त्यानंतर वडिलांच्या मोबाईल नंबरवर हिंदी भाषेत मेसेज करुन अपहरण करता बोलत असल्याचे भासवून दीड लाख रुपयांची खंडणी मागली. तसेच पैसे न दिल्यास आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यास मुलाला मारुण टाकण्याची धमकी दिली. यावर विनय याचे वडिल राजेंद्र यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस पथक आणि खंडणी विरोधी पथकाने एकत्रीतरित्या तपास चक्र फिरवत तांत्रिक माहितीच्या आधारे धमकीचा मेसेज आलेला मोबाईल नंबर ट्रेस केला. मोबाईलचे लोकेशन मुंबईतले दाखवत होते. त्याआधारे पोलीसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले त्यांनी सीएसटी रेल्वे स्थानकावर शोध घेत असता त्यांना विनय तेथे आढळून आला. पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांने स्वत:च अपहरणाचा बनाव रचल्याचे कबुल केले. तसेच रेल्वे प्रवासात एकाचा मोबाईल चोरुन त्याव्दारे वडिल राजेंद्र यांना मेसेज करुन धमकावल्याचेही सांगितले. पोलिसांनी विनय याला ताब्यात घेतले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, परिमंडळ एखच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे, पोलीस उपनिरीक्षक चाटे, हवालदार रविंद्र तिटकारे, लिंभोरे, दिपक महाजन, स्वप्नील लांडगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद कलाटे, नवनाथ पोटे, करन विश्वासे, विशाल काळे, तसेच खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार महेश खांडे, काटकर, सागर शेंडगे, पुलगम यांच्या पथकाने केली.