भीमा कोरेगाव प्रकरणात रांची मधून फादर स्टॅन स्वामी यांना अटक

0
266

रांची, दि. ९ (पीसीबी) – जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना रांचीमध्ये अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) च्या मुंबईहून आलेल्या एका पथकाने गुरुवारी (8 ऑक्टोबर) संध्याकाळी उशिरा त्यांना अटक केली. बगाईचा भागातल्या त्यांच्या कार्यालयातून त्यांना अटक करण्यात आली. 83 वर्षांचे स्टॅन स्वामी त्यांच्या कार्यालयातल्याच एका खोलीत एकटे राहतात.

भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये सहभागी होण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एनआयएने त्यांच्यावर दहशतवाद विरोधी कायदा (यूएपीए) च्या अंतर्गतही गुन्हे दाखल केले आहेत. 1967मध्ये अस्तित्त्वात आलेल्या दहशतवाद विरोधी कायद्यामध्ये सध्याच्या मोदी सरकारने गेल्या वर्षी सुधारणा केल्या होत्या.

विरोधी पक्ष आणि समाजसेवी संघटनांचा याला प्रखर विरोध होता. या सुधारणेनुसार कोणतीही व्यक्ती वा संस्थेला दहशदवादी असल्याचं जाहीर केलं जाऊ शकतं. आदिवासींच्या हक्कांसाठी पुढाकार घेणाऱ्या स्टॅन स्वामींवर यूएपीए सोबतच भारतीय दंड संहिताच्या अनेक गंभीर कलमांतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एनआयए ने या अटकेविषयीची माहिती जाहीर केलेली नसली तर बीबीसीकडे याविषयीची अधिकृत कागदपत्रं आहेत. एनआयए चे अधिक्षक अजय कुमार कदम यांनी स्टॅन स्वामींना अटक करण्यात आल्याला या कागदपत्रांतून दुजोरा दिलाय. या कागदपत्रांची एक प्रत स्टॅन स्वामींनाही देण्यात आली आहे. स्वामींचे सहकारी पीटर मार्टिन यांनी या अटकेच्या वृत्ताला बीबीसीशी बोलताना दुजोरा दिला.

पीटर मार्टिन म्हणाले, “एनआएयच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला त्यांचे कपडे आणि सामान आणायला सांगितलं आहे. रात्रीतूनच हे सामान पोचवावं असं सांगण्यात आलंय. एनआयएची टीम त्यांना रांची कोर्टात सादर करणार आहे की थेट मुंबईला नेण्यात येणार हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही. फादर स्टॅन स्वामींचं वय जास्त आहे आणि ते आजारी असतात, म्हणून आम्हाला त्यांची काळजी वाटतेय.”