भीमा कोरेगांव प्रकरण; ‘त्या’ पाच जणांच्या नजरकैदेवर सोमवारी निकाल   

0
417

पुणे,  दि. २० (पीसीबी) – भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणातील पाच जणांची नजरकैद कायम आहे. आता याबाबत सोमवारी (दि. २४) सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.  या पाच जणांच्या सुटकेसाठी याचिका दाखल केली आहे, तर त्यांच्या अटकेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मात्र, पुणे पोलिसांनी त्याला विरोध करत   अटकेतील लोक हिंसा भडकवण्याच्या कटात सहभागी होते, असा दावा केला होता.

न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पुणे पोलिसांना शनिवारपर्यंत संपूर्ण खटल्याचा तपशील न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर याचिकाकर्त्यांनाही लेखी दस्तऐवज जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जर पुरावे बनावट आढळल्यास खटलाच रद्द करु, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

दरम्यान, १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार उफाळून आला होता. या २८ ऑगस्टला पाच सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरनॉन गोंजाल्विस, वरवरा राव आणि अरुण परेरा यांना देशातील विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली. २९ ऑगस्ट रोजी इतिहासकार रोमिला थापर यांच्यासह पाच जणांनी या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात  याचिका दाखल केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या  पाच जणांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते.