भारताची सरावातून वेगवान गोलंदाजांना विश्रांती

0
386

मेलबोर्न, दि. १३ (पीसीबी) : ब्रिस्बेनची चौथी कसोटी सुरू होईपर्यंत भारताच्या जखमी खेळाडूंची यादी वाढतच आहे. अशा वेळी कसोटीपूर्वी आज झालेल्या सराव सत्रातून त्यांनी वेगवान गोलंदाजांना विश्रांती दिली. पोटाचे स्नायु दुखावल्यामुळे बुमरा खेळणार नाही हे निश्चित आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाला हा सर्वांत मोठा धक्का आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा यापूर्वीच अंगठ्याच्या दुखापतीमुळे, तर हनुमा विहारी स्नायुंच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. अश्विनच्याही पाठदुखीने डोके वर काढले आहे. त्यामुळे त्याच्याही खेळण्याची शक्यता कमी आहे.

अशा सगळ्या परिस्थितीत आज वेगवान गोलंदाजांनी सरावात फारसा सहभाग घेतला नाही. संघाच्या दुखापतींकडे लक्ष देता आता बुमराच्या जागी एकतर शार्दुल ठाकूरला पुनरागमन करण्याची संधी दिली जाईल किंवा नटराजनला पदार्पण करण्याची संधी मिळेल. ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानाची खेळपट्टी वेग आणि उसळीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या कसोटीत वेगवान गोलंदाजांनाच अधिक महत्व राहणार यात शंका नाही.

भारतीय संघ व्यवस्थापनाला विहारीच्या जागी कुणाला घ्यायचे आणि पंत यष्टिरक्षण करू शकतो का या सगळ्या गोष्टींचाही विचार करावा लागणार आहे. विहारीच्या जागी वृद्धिमान सहाला संधी देऊन सहा, पंत दोघांनाही खेळविण्याचा पर्याय संघ व्यवस्थापनासमोर असेल. हा निर्णय घेताना मयांकच्या तंदुरुस्तीचा आणि पृथ्वी शॉ संघात असल्याचा विचारही त्यांना करावा लागणार आहे.