भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचा दुसरा लेटर बॉंम्ब

0
963

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा लेटर बॉम्बचा सिलसिला सुरूच आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आज त्यांनी दुसरे एक पत्र देत विविध कामांची माहिती मागविली आहे. मागच्या पत्राबद्दल काय झाले ते अद्याप समोर आलेले नाही. पत्रव्यवहाराचा हा आता दुसरा अंक आहे. पहिल्यांदा विविध आरोप करत 26 प्रश्नांची उत्तरे मागविल्यानंतर आता आमदार जगताप यांनी पालिका मुख्यालय, प्रभागनिहाय चालू असलेल्या देखभाल व दुरुस्ती विषयक कामांविषयी, कामांच्या झालेल्या निविदा व संबंधित ठेकेदारांची माहिती आयुक्तांकडून मागिविली आहे.

आमदार जगताप यांनी सोमवारी (दि.27) आयुक्तांना पत्र पाठविले आहे. दरम्यान, 15 दिवसांत आमदारांनी आयुक्तांना हे दुसरे पत्र पाठविले आहे. आमदार जगताप आपल्या पत्रात म्हणतात, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील सद्यस्थितीत सुरु असलेल्या देखभाव व दुरुस्ती विषयक कामांची माहिती देण्यात यावी. त्यात रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती विषयक कामे, विद्युत, जलनि:सारण, स्थापत्य, उद्यान विभागाच्या कामांची माहिती द्यावी. तसेच प्रभागातील शासकीय इमारतींची देखभाल, दुरुस्ती विषयक कामे व इतर देखभाल व दुरुस्तींच्या कामांचा तपशील देण्यात यावा. या कामांच्या झालेल्या निविदा व संबंधित
ठेकेदारांची माहिती अवगत करावी.

दरम्यान, आमदार जगताप यांनी आयुक्तांना 9 जुलै रोजी पहिले पत्र पाठविले होते. त्यात आयुक्त हर्डीकर यांच्यावर विविध गंभीर आरोप केले होते. तसेच विविध 26 मुद्यांची प्रश्नावली पाठविली होती. त्याचे उत्तर मागविले होते. त्यानंतर आता 15 दिवसांनी पुन्हा जगताप यांनी आयुक्तांना पत्र पाठविले आहे. यामुळे आमदार जगताप आणि आयुक्त हर्डीकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, स्थायी समितीचे माजी स्थायी विलास मडिगेरी यांच्या कारकिर्दीतील शेवटच्या दोन मिटींगमध्ये मंजुर झालेल्या विषयांपैकीच माहिती आमदार जगताप यांनी मागविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. किती व कोणत्या कामांचे आदेश दिले आहेत ? व किती व कोणत्या कामांचे आदेश दिले नाहीत ? कामांचे आदेश न देण्याचे कारण काय आहे ? याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी माहिती मागितली आहे. सर्व कार्यकारी अभियंता यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील वरीलप्रमाणे माहिती दोन दिवसात देणेबाबत शहर अभियंता यांनी सुचना दिल्या आहेत.