भाजपा नगरसेविका सुजाता पालांडे कोरोना पॉझिटिव्ह

0
491

पिंपरी,दि.२३(पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या जेष्ठ नगरसेविका सुजाता पालांडे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेला पालांडे या उपस्थित असल्याने आता नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.

नागरिकांच्या सतत संपर्कामुळे लोकप्रतिनिधींनी कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे.भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना कोरोना झाला होता, पण त्यांनी त्यावर मात केली. महापालिकेतील १३ नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाली होती. दुदैवाने माजी विरोधी पक्षनेते आणि जेष्ठ नगरसेवक दत्ता साने तसेच जावेद शेख यांचे निधन झाले. माजी महापौर रंगनाथ फुगे, माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड, एकनाथ थोरात यांचेही कोरोना मुळे प्रकृती बिघडली आणि निधन झाले. 

दोन नगरसेवकांचे निधन झाल्याने आजी-माजी नगरसेवकांसह सर्वजण सावध झाले.
राहुल कलाटे, कमल घोलप, उत्तम केंदळे, निलेश बारणे, शैलेष मोरे, तुषार कामठे, चंदा लोखंडे, डब्बू आसवाणी, अनुराधा गोफणे, बाबू नायर या नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाली होती. सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, माजी नगरसेवक तानाजी खाडे यांच्यावर सद्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दोनवेळा क्वारंटाईन व्हायची वेळ आली होती. अधिकाऱ्यांपैकी अण्णा बाधडे यांच्यासह उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांच्यासह ६५ कर्मचाऱ्यांना बाधा झाली होती.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ४० हजाराच्या पुढे गेली आहे. रोज सरासरी १ हजारावर नवीन रुग्ण बाधीत होतात आणि किमान २० ते २५ मृत आहेत. त्यात आता सर्व निर्बंध खुले झाल्याने बाजारपेठेतील गर्दी वाढली असून नागरिकांमध्ये भितीचे सावट आहे.