गणेश मूर्ती विसर्जन कुठे करायचे ?

0
595

नागरिकांचा प्रचंड गोंधळ, नदिचे सर्व घाट बंद, प्लॅस्टर मूर्ती घरी विसर्जित करणे अशक्य

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून गणेश विसर्जनासाठी पवना व इंद्रायणी नदिचे सर्व घाट महापालिकेने पत्रे लावून बंद केले आहेत. विसर्जन घरीच करा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात तरंगतात, विसर्जित होत नसल्याने आता विसर्जन कुठे करायचे हा गहन प्रश्न निर्माण झाल्याने गणेश भक्त संतापले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात सुमारे ५ लाख घरांतून गणपती मूर्ती बसविल्या जातात. कामगारनगरी असल्याने इथे अर्धे अधिक गणपती पाच दिवसांत विसर्जित करण्याची प्रथा आहे. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस आणि शेवटी अनंत चतुर्थी असे विसर्जन केले जाते. शनिवारी बसविलेल्या दीड दिवसांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करायचे असल्याने नागरिकांची कुचंबना झाली. महापालिकेने नदिचे सर्व घाट बंद केले. त्यासाठी सर्व घाटांवर पत्रे लावून रस्ते, घाट बंद केले. महत्वाची अडचण म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत, त्या दुसरीकडे विसर्जित कऱण्याची सोय नाही. परिणामी मूर्ती कुठे विसर्जित करायचा हा गहन प्रश्न समोर आला आहे.

पुणे महापालिकेचा स्तुत्य उपक्रम
पुणे महापालिकेने एक चांगली सोय केली. नागरिकांनी नदी घाटावर जाऊच नये यासाठी फिरत्या हौदांची सोय केली. त्याशिवाय घरगुती विसर्जनासाठी दुसरा पर्याय दिला. अमोनियम बायकार्बोनेट प्रत्येकी २ किलो प्रमाणे वाटप केले. बादलीत पाणी घेऊन त्यात अमोनियम बायकार्बोनेट मिसळायचे. त्यात प्लॅस्टरची मूर्ती ४८ तासापर्यंत ठेवली की ती विसर्जित होते. अशा पध्दतीने पिंपरी चिंचवड महापालिकेने सोय केली पाहिजे, पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने गोंधळ उडाला आहे.

  • दरम्यान, गणेश भक्तांच्या असंख्य तक्रारी कानावर आल्याने खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना फोन करून त्याबाबत विचारणा केली. प्लॅस्टरच्या मूर्ती घरी विसर्जित करणे अशक्य असल्याने नदिचे घाट त्वरीत खुले करा अन्यथा फिरते विसर्जन हौदाची सोय करा असे पर्याय त्यांनी सुचविले आहेत. महापालिका आयुक्तांनी फिरते विसर्जन हौदाची सोय करण्याचे मान्य केले आहे, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी `पीसीबी टुडे` प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.