भाजपविरोधात राज ठाकरेंची तोफ धडाडणार; राज्यात ८ ते ९ प्रचारसभा घेणार  

0
507

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – मनसेने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यात भाजपविरोधात  आठ ते नऊ प्रचार सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. मनसेच्या स्वतंत्र मंचावरून राज ठाकरे यांची तोफ धडाडणार असून सभांच्या तारखा  अद्याप समजू शकलेल्या नाहीत.

राज ठाकरे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर, अशोक चव्हाण यांच्या नांदेड, राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मावळ, सुप्रिया सुळे यांच्या बारामती, उदयनराजे यांच्या सातारा मतदारसंघात प्रचारसभा घेणार आहेत.

तसेच काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या उत्तर मुंबई, प्रिया दत्त यांच्या उत्तर-मध्य मुंबई, राष्ट्रवादीचे उमेदवार संजयदीना पाटील यांच्या ईशान्य मुंबई आणि समीर भुजबळ यांच्या नाशिक या मतदारसंघांमध्ये राज ठाकरे प्रचार सभा घेणार असल्याचे समजते.

दरम्यान, भाजपविरोधातील राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा आघाडीच्या उमेदवारांना होण्याची शक्यता आहे. आता राज ठाकरे सभामधून भाजपविरोधात काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.