भाजपने दारे पूर्णपणे उघडली, तर काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये कुणीच शिल्लक राहणार नाही – अमित शहा

0
414

सोलापूर, दि. २ (पीसीबी) – भाजपने आपली दारे पूर्णपणे उघडली,  तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणीच शिल्लक राहणार नाही, असा टोला भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी लगावला. भाजपच्या ‘महाजनादेश यात्रे’च्या दुसऱ्या टप्प्याचा  सोलापूरमधील इंदिरा गांधी स्टेडियमवर सांगता झाली.

यावेळी आयोजित सभेत  शहा बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे लोकशाही मूल्यांना मानत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फक्त घराणेशाही आहे.  सामान्य युवकांना अधिकार नाही का? यांनी राजकारणाला स्वतःचा ठेका समजला आहे.   अजित पवार यांनी  ७४  हजार कोटींचा घोटाळा केला.  तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी ८ हजार कोटींमध्ये  २२ हजार गावात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाणी आणले.

विरोधकांनी केंद्र आणि राज्यात सत्ता असताना घोटाळा केला. शहिदांसाठी केलेल्या घरात देखील घोटाळा केला.  आम्ही आजपर्यंत एक रुपयांचा घोटाळा केला नाही.  विरोधक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे फक्त लॉलीपॉप दाखवत होते.  मात्र आम्ही जलपूजन करत कामाला सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील स्मारकाचे काम सुरु केले आहे, असे ते म्हणाले.

शहा पुढे म्हणाले की, ३७० मुळे काश्मीर देशापासून दुरावलेला होते. मात्र मोदीजींनी ते आपल्यात आणले. काश्मीर  कायमस्वरूपासाठी भारताचे झाले.  ३७०  रद्द करून पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले. पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय कोणत्याही पंतप्रधानामध्ये  ३७० रद्द करण्याची हिम्मत नाही, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी आणि शरद पवार यांना विचारतो की ३७० रद्द करण्याचे तुम्ही समर्थन करता की नाही?  राहुल गांधी म्हणतात काश्मीर अशांत आहे. मात्र ५ ऑगस्टनंतर एकही गोळी काश्मीरमध्ये चालली नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा वापर पाकिस्तान करत आहे.  राहुल गांधी आणि पाकिस्तान यांचे बोलणे एकच आहे, असेही ते म्हणाले.