भाजपनं फक्त इतरांवर भुंकण्यासाठी राणेंना जवळ केलं. जो कुणाचा नाही झाला , तो भाजपचा तरी काय होणार

0
248

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राणेंना कालच अटक करण्यात आली. त्यांनतर राज्यात अनेक ठिकाणी वातावरण चांगलंच तप्त झालं होतं. या नाट्य घडामोडीनंतर राणेंना अखेर रात्री उशिरा न्यायालयाने दिलासा दिला. राणेंना जामीन मंजूर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. यांनतर भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष परस्परावर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केलीय. आता मात्र हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि आमदार संतोष बांगर यांनी नारायण राणेबाबत वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलं आहे. राणेंनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून काल राज्यात अनेक जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक झाले होते. काही ठिकाणी सेना भाजप आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. तसेच, यावरून हिंगोलीत नारायण राणेंचा फोटो कुत्र्याच्या गळ्यात लटकवून प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढण्यात आली. या दरम्यान, शिवसैनिकांनी तीव्र शब्दांत नारायण राणेंचा निषेध देखील केला आहे.

यावेळी राणेंवर टीका करताना आमदार संतोष बांगर यांची जीभ घसरली आहे, बांगर यांनी नारायण राणेंचा एकेरी उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केलाय. कोंबडीचोर चाराने आणि त्याची दोन पिल्ले यांनी मुख्यमंत्री साहेबां विषयी बोलताना भान राखून बोलावे अन्यथा गाठ माझ्याशी आहे-आमदार संतोष बांगर.

टीका करत असताना आमदार संतोष बांगर म्हणाले की, ‘अरे तू काय सांगतो, कुठं यायचं कुठं यायचं. तुझ्या घरात घुसून तुला मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझा पोलीस बंदोबस्त थोडा बाजूला करा. हा संतोष बांगर, शिवसेनेचा मावळा, छत्रपतींचा मावळा एकटा येऊन चारीमुंड्या चीत करेल. तुझा कोथळा बाहेर नाही काढला तर नाव सांगणार नाही,’ असं वादग्रस्त आणि प्रक्षोभक विधान आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी राणेंची तुलना कुत्र्याशी करत भाजपलादेखील इशारा दिला आहे. राणेला कोकणातल्या लोकांनी नाकारलं. मुंबईत त्याला मतदारांनी नाकारलं. मात्र भाजपनं फक्त इतरांवर भुंकण्यासाठी त्यांना जवळ केलंय. इतरांच्या अंगावर सोडण्यासाठी भाजपनं त्यांना सोबत घेतलंय.पण जो कधीच कुणाचा झाला नाही, तो भाजपचा तरी काय होणार, असं त्यांनी म्हटलं आहे.