भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

0
1117
पिंपरी-चिंचवड शहरातील रिंग रोड मार्गाच्या आराखडय़ात बदल

पिंपरी, दि.२० (पीसीबी) – तीव्र विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील रिंग रोड मार्गाच्या पूर्वनियोजित आराखडय़ात अखेर बदल करण्यात आला आहे. प्रस्तावितमार्गातील ज्या भागात दाट लोकसंख्या आहे, तेथून जाणारा मार्ग पर्यायी जागेतून नेण्यात येणार असून त्यामुळे पाच हजाराहून अधिक घरे वाचणार असल्याचा दावा पिंपरी-चिंचवड महापालिकेने केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ३२ किमी लांबीचा रिंग रोड मार्ग विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, वाल्हेकरवाडी, पिंपळे गुरव,पिंपळे सौदागर, नाशिक फाटय़ाचा काही भाग, लांडेवाडी, इंद्रायणीनगर, स्पाईन रस्ता आदींचा समावेश रिंग रोड मार्गात होतो. या मार्गामुळे मोठय़ा प्रमाणात नागरिकांची घरे पाडावी लागणार होती. त्यामुळे संबंधित रहिवाशांचा रिंग रोड मार्गाला तीव्र विरोध होता. संभाव्य बाधितांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कृती समितीच्या माध्यमातून या रहिवाशांनी सतत आंदोलने देखील केली.

हा आंदोलक वर्ग सत्ताधारी भाजपच्या विरोधात उघडपणे उतरला होता. त्यावरून इतर पक्षांचे राजकारणही सुरू झाले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विरोधाचा फटका भाजपला बसला. आगामी पालिका निवडणुकीत हीच परिस्थिती राहण्याची शक्यता दिसून आल्याने भाजपने दोन पावले मागे येण्याची भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रिंग रोड मार्गाच्या पूर्वनियोजित आराखडय़ात बदल करण्याचा निर्णय भाजपने घेतला. या रस्त्याची नव्याने आखणी करावी, असे पत्र भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले होते. त्यावर प्रशासकीय पातळीवर प्रदीर्घ चर्चा झाली. पालिका मुख्यालयात महापौर माई ढोरे आणि आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मार्गात बदल करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात आले.