भर दिवसा घरफोडी करून पाऊण लाखांचा ऐवज लंपास

0
229

आकुर्डी, दि. १५ (पीसीबी) – भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 72 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 14) सकाळी दहा ते दुपारी दोन वाजताच्या कालावधीत संजय काळे मैदानासमोर आकुर्डी प्राधिकरण येथे घडली.

लता दीपक पडवळ (वय 37, रा. संजय काळे मैदानासमोर आकुर्डी प्राधिकरण) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पडवळ या सोमवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेल्या. कामावरून त्या दुपारी दोन वाजताच्या सुमारास घरी आल्या. दरम्यानच्या कालावधीत यांच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा कट करून चोरट्यांनी घरातील कपाटाच्या ड्राॅवर मधून 72 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे उघडकीस आले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.