भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी,  सेवक विनायक दुधाळेला अटक

0
2350

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी त्यांचा विश्वासू सेवक विनायक दुधाळेला अटक केली आहे. भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर विनायक दुधाळे फरार झाला होता. त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना आता यश आले आहे.

विनायक दुधाळेला अटक करण्यात आल्याने भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. आझाद नगर पोलीस ठाण्यात त्याची रवानगी करण्यात आली आहे. १२ जून २०१८ ला भय्यूजी महाराजांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली? याचे गूढ अद्यापही कायम आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले गेले. त्यामुळेच पोलीस विनायक दुधाळेच्या शोधात होते. आता त्याच्या अटकेनंतर कदाचित हे गूढ उकलण्याची शक्यता आहे.

२० डिसेंबरलाच भय्यूजी महाराजांची मुलगी कुहूने आत्महत्येमागे काय कारण आहे ते शोधाच अशी मागणी केली होती. कोणत्याही संस्थेमार्फत चौकशी करा मात्र आम्हाला कारण कळू द्या अशी मागणी भय्यूजी महाराजांच्या कन्या कुहू यांनी केली आहे. आत्महत्येमागे आर्थिक कारण होते की कौटुंबिक याची चर्चा सुरु झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर कुहूने ही मागणी केली. आता विनायक दुधाळेच्या चौकशीतून हे गूढ उकलण्याची शक्यता आहे.