बोपखेल पूल कामाचे वर्क ऑर्डर तातडीने देऊन कामाचे भूमिपूजन करा; आमदार जगतापांची स्थायीला व प्रशासनाला सूचना

0
494

पिंपरी,  दि. २७  (पीसीबी) –  बोपखेल गावासाठी मुळा नदीवर कायमस्वरूपी पूल उभारण्याच्या कामाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी (दि. २६) मंजुरी दिली आहे. काम मंजूर केलेल्या संबंधित ठेकेदाराला कामाचा आदेश (वर्क ऑर्डर) तातडीने देण्याची सूचना स्थायी समिती सभापतींना करण्यात आली आहे. तसेच नदीवर पूल उभारण्याच्या कामाचे तातडीने भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यासही महापालिका प्रशासनाला सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे निर्धारित वेळेच्या आत दर्जात्मक काम करून बोपखेलवासीयांना लवकरात लवकर हक्काचा रस्ता उपलब्ध करून देण्याबाबतही स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली. 

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,  बोपखेल गावाच्या रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. लष्कराच्या हद्दीने वेढलेल्या बोपखेलवासीयांना हक्काच्या रस्त्यासाठी त्रास सोसावा लागला. दापोडीतील सीएमईच्या हद्दीतून जाणारा रस्ता बंद झाल्यानंतर बोपखेलवासीयांची रस्ताकोंडी झाली होती. बोपखेलवासीयांनी विविध आंदोलनांसोबतच संयमाने भूमिका घेत रस्त्याच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. स्थानिक नगरसेविका हिराबाई घुले आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले हे बोपखेलवासीयांच्या वतीने शासकीय पातळीवर रस्त्यासाठी पाठपुरावा करत होते. आम्ही सर्वांनी सातत्याने तहसीलदारांपासून ते जिल्हाधिकारी, लष्कराचे संबंधित अधिकारी, राज्याचे मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केल्यानंतर बोपखेलसाठी मुळा नदीवर पूल उभारण्याचा निर्णय झाला. परंतु, पूल उभारणी आणि त्यापुढील रस्त्यासाठी पुन्हा लष्कराचीच चार एकर जागा हवी असल्याने हा प्रश्न सुटण्यास थोडा वेळ लागला.

आधी लष्कराने जागेच्या बदल्यात पैशांची मागणी केली. महापालिकेने ती पूर्ण करण्याची प्रशासकीय कार्यवाही केल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी जागेच्या मोबदल्यात जागेचीच मागणी केली. ही मागणी पूर्ण केल्याशिवाय बोपखेलवासीयांना कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून देणे शक्य नव्हते. त्यामुळे लष्कराला कोणती जागा द्यायची यावरून जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर खल झाला. अखेर येरवडा येथील सर्व्हे क्रमांक २०२/२ मधील चार एकर जागा लष्कराला देण्याचे निश्चित झाले आणि मुळा नदीवर पूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. एकीकडे लष्कराला जागा देण्यासोबतच मुळा नदीवर पूल उभारण्याच्या कामाची महापालिका स्तरावर प्रशासकीय कार्यवाही सुरूच होती. या कामाची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. पूल उभारण्याच्या कामासाठी अंदाजित रक्कम गृहित धरून महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली होती. प्रशासनाने निविदेची प्रक्रिया पूर्ण केल्याने कामाच्या खर्चाला मंजुरी देण्याबाबत स्थायी समितीला सूचना करण्यात आली होती.

मुळा नदीवर पूल उभारण्याच्या कामासाठी मे. टी अॅण्ड टी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही ठेकेदार कंपनी पात्र ठरली आहे. त्यानुसार स्थायी समितीने बुधवारी (दि. २६) झालेल्या सभेत पूल उभारण्याच्या कामासाठी ५३ कोटी ५३ लाख ३७ हजार ५९४ रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. आता बोपखेलकरांसाठी या पुलाचे काम तातडीने होणे गरजेचे आहे. त्यामुळे कामाच्या खर्चाला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित ठेकेदाराला कामाचा आदेश (वर्क ऑर्डर) तातडीने देण्याची सूचना स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कामाचे भूमीपूजन करून प्रत्यक्ष कामालाही लवकरात लवकर सुरू करण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे. हे काम निर्धारित वेळेच्या आत पूर्ण करून बोपखेलवासीयांना हक्काचा रस्ता लवकर उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्याबाबतही स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.”