बेंगळुरूतील एअरो इंडिया शोमधील पार्किंगला आग; १०० गाड्या जळून खाक

0
587

बेंगळुरू, दि. २३ (पीसीबी) – येथील एअरो इंडिया शोमधील ‘सूर्यकिरण’ विमानांच्या अपघाताची घटना ताजी असतानाच आज (शनिवार) येथील पार्किंग लॉटमध्ये आग लागून सुमारे १०० कार जळून बेचिराख झाल्या. अग्निशमन जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे. या दुर्घटनेत  कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पार्किंग स्थळावरील सुक्या गवतात आगीची  ठिणगी पडल्याने  ही आग लागल्याचे सांगितले जात  आहे.  तर  कुणीतरी जळती सिगारेट गवतात टाकल्यामुळे ही आग लागली असावी. सुके गवत आणि जोरदार वाऱ्यामुळे ही आग जोरात भडकली. पार्किंग स्थळावर असलेल्या दुचाकी आणि कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

दरम्यान, आगीच्या घटनेनंतर येथील तळावरून  विमानांचे उड्डाण थांबवण्यात आले. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतरच विमानांच्या उड्डाणांना परवानगी देण्यात येणार आहे,  अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.