बावधन येथे रागाने बगीतल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणावर चाकुने वार

0
589

हिंजवडी, दि. ७ (पीसीबी) – रागाने बगीतल्याचा जाब विचारल्याने एका तरुणाला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन चेहऱ्यावर चाकुने वार करण्यात आले. ही घटना शुक्रवार (दि.५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास बावधन विज्ञाननगर येथील प्रभात सोसायटी समोरील रस्त्यावर घडली.

प्रसाद दत्तात्रय फोके (वय १९, रा. गोकुळनगर पठार, सर्वे नं.५६, प्लॉट नं.२८, वारजे माळवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रितेश महादेव अडागळे आणि रोहीत महादेव अडागळे या दोघा भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रसाद हा त्याच्या मित्रांसोबत बावधन विज्ञाननगर येथील प्रभात सोसायटी समोरील रस्त्यावर उभा होता. यावेळी रितेश हा त्याच्याकडे रागाने बगत होता. यामुळे प्रसाद याने रितेश याला “तु माझ्याकडे रागाने का बघतो” , असा जाब विचारला. याचा राग रितेश याचा भाऊ रोहीतला आला त्याने लाकडी बांबुने प्रसाद याला जबर मारहाण करुन त्यांच्या उजव्या गालावर चाकुने वार केले. आरोपी रितेश आणि रोहीत या दोघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक दिवटे तपास करत आहेत.