बालेवाडीत तरुणाने लेडिज हॉस्टेलमध्ये घुसून केला गोळीबार

0
1215

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – प्रेमास नकार दिल्याच्या कारणावरुन एका २३ वर्षीय बेरोजगार इंजिनिअरने तरूणीच्या हॉस्टेलमध्ये घुसून गोळीबार केल्याची धक्कदायक घटना समोर आली  आहे. ही घटना बालेवाडीतील नीक मार्क कॉलेजच्या लेडिज हॉस्टेलमध्ये घडली.

सूरज महेंद्रकुमार सोनी (रा. मध्य प्रदेश) असे गोळीबार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. गोळीबार केल्यानंतर तरूणाने पाचव्या मजल्यावरून उडी मारत पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज सोनी हा मूळचा मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. सूरजचे त्यांच्या कॉलेजमधील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. तिला प्रपोज केले असता तिने त्याला नकार दिला होता. यामुळे तिला घाबरवण्यासाठी सूरज बालेवाडीतील नीक मार्क कॉलेजच्या लेडिज हॉस्टेलमध्ये घुसला, तेथे त्या तरूणीशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीने बोलण्यासही नकार दिल्याने सूरजने तिला घाबरवण्यासाठी आपल्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून होस्टेलमधे गोंधळ सुरू झाला. मुली जमा होत असल्याचे पाहून त्याने स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी हॉस्टेल पाचव्या मजल्यावरुन उडी घेतली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुरज याला ससून रुग्णालयात दाखल करुन त्याच्या जवळील पिस्तुल जप्त केले आहे. चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.