बापरे! राज्यात ‘या’ भागात आढळला ‘झिका’चा पहिला रुग्ण

0
202

पुणे, दि.०१ (पीसीबी) : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने काहीसा दिलासा मिळत असताना राज्याच्या आरोग्य यंत्रणेपुढे आणखी एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस आणि इतर सापडलेले नवीन व्हायरस यांचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणा काम करत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वीच महाराष्ट्रात ‘झिका’ नावाचा विषाणु आढळून आला आहे.

महाराष्ट्रात झिका विषाणू (Zika Virus) असलेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. राज्यातील पुणे जिल्ह्यातील (Pune district) पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिकाचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे परिसरातील पाच किलोमीटर मधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. झिकाचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

पुरंदर तालुक्यातील बेलसर गावामध्ये दीड महिन्यापूर्वी डेंग्यू, चिकनगुनिया आणि इतर साथिच्या रोगांना थैमान घातले होते. या पार्श्वभूमीवर एनआयव्ही पुणे यांनी बेलसर गावातील 51 जणांच्या रक्ताचे नमुने गोळा केले होते. या नमुन्याची तपासणी केली असता यामध्ये प्रामुख्याने झिका विषाणूचा एक रुग्ण असल्याचे दिसून आले. झिकाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बेलसर गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तात्काळ पुढील उपाय-योजना करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा आरोग्य विभाग देखील बेलसर गावात दाखल झाला आहे.

काय आहे झिका विषाणू ?
झिका विषाणू हा 1947 मध्ये सर्वप्रथम आफ्रिका आणि एशियामध्ये आढळून आला होता. या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही. अशावेळी स्वत:ला डासांपासून दूर ठेवणे हा एकमेव उपाय आहे. झिका व्हायरस डासांमुळे पसरतो. झिका व्हायरसमुळे ब्राझीलमध्ये नवजात बालकांच्या मेंदूवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान पुरंदरमध्ये पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर, आरोग्य विभागाने कोणीही घाबरून न जाता काळजी घेणे हा एकमेव पर्याय असल्याचे आवाहन केले आहे.
लक्षणे

झिका व्हायरसने ग्रस्त व्यक्तीमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात.
ज्या लोकांना या व्हायरसने ग्रासले आहे. त्यांनी आराम करणे आवश्यक आहे. तसेच याच्या लक्षणामध्ये शरीरावर लाल रंगाचे चट्टेही दिसतात.
उपाययोजना

– घरात डास होऊ देऊ नका. मच्छरदानीचा वापर करा.
– घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी बसवा
– घरात पाणी साठणार नाही याची काळजी घ्या, पाणी जास्तवेळ उघडे ठेवू नका.
– प्रवास करुन आल्यानंतर दोन दिवस ताप राहिल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
– ज्या ठिकाणी व्हायरस पसला आहे तेथून प्रवास करु येणाऱ्या महिलांनी किमान 8 आठवडे गर्भधारणा होऊ देऊ नये.