बापरे! दीडपट परताव्याचे अमिश दाखवून अशी केली कोट्यवधींची फसवणूक

0
251

आकुर्डी, दि.१७ (पीसीबी) – व्यवसायात गुंतवणूक केल्यास ठराविक कालावधी नंतर दीडपट परतावा देण्याचे अमिश दाखवून 13 जणांची एक कोटी 11 लाख 98 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. याबाबत सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार काळभोरनगर, आकुर्डी येथे घडला.

डी एस जी एम इंडिया प्रा ली सुरत गुजरात कंपनीचे संचालक भार्गव पंड्या, शिवानीबेन भार्गव पंड्या, अध्यक्ष महेंद्र पंड्या, कंपनीचे सीईओ हीन सिंग, मार्केटिंग विभागाचे अधिकारी राजेश धिमान, कामरान भगेल, संजय खान (रा. कुरुक्षेत्र, अंबरला, चंदिगढ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत दत्तात्रय मारुती खुणे (वय 48, रा. पुर्णानगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 16 डिसेंबर 2018 आणि 23 मार्च 2019 या कालावधीत काळभोरनगर, आकुर्डी येथील एका हॉटेलमध्ये घडला. आरोपींनी रॉयल प्रोजेक्ट रामदेव पी व्ही सी प्रोडक्ट प्रा ली, एलोना डी एस जी एम इम्पोटेक, डी एस जी एम ग्राफीस लाईफ केअर आदी कंपन्या स्थापन केल्या. त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आरोपींनी काळभोरनगर, आकुर्डी येथील एका हॉटेलमध्ये कार्यक्रम घेतला. कंपनीमध्ये जेवढी गुंतवणूक कराल, त्याच्या दीडपट परतावा ठराविक कालावधीनंतर देण्यात येईल. असे आरोपींनी अमिश दाखवले. त्यामुळे फिर्यादी खुणे यांनी आरोपींच्या कंपनीत 34 लाख 5 हजार तसेच अन्य 12 जणांनी 77 लाख 93 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केली. आरोपींनी फिर्यादी आणि अन्य गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून एक कोटी 11 लाख 98 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.