बांधकाम साईटवरून पडून कामगाराचा मृत्यू

0
352

रावेत, दि.१४ (पीसीबी) : बांधकाम साईटवरून पडल्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. याबाबत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 7 मार्च रोजी सकाळी मस्के वस्ती, रावेत येथे सोनिग्रा अँड भोसले असोसिएट या बांधकाम साईटवर घडली.

राम मोहन हांडे (वय 49, रा. हडपसर), लक्ष्मण गंगाधर मोरे (वय 30, रा. शिरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सचिन गोपाळ अलावे (वय 18, रा. रावेत) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक महादू डामसे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्के वस्ती, रावेत येथे सोनिग्रा अँड भोसले असोसिएट ही बांधकाम साईट सुरु आहे. त्यावर मयत कामगार सचिन हा काम करत होता. 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास सचिन बांधकाम साईटवरून पडला. त्यात गंभीर जखमी झालेल्या सचिनचा मृत्यू झाला. आरोपी राम आणि लक्ष्मण या दोघांनी हे बांधकाम बांधण्यासाठी घेतले होते. त्यांनी कामगारांना सुरक्षेची साधने दिली नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.