फॅन्सी नंबरप्लेट, सायलंसर बदलून देणाऱ्या दुकानदारांवर होणार कारवाई

0
259

पिंपरी, दि. 30 (पीसीबी) : फॅन्सी नंबर प्लेट बनवून देणाऱ्या तसेच सायलंसर बदलून देणाऱ्या दुकानदारांवर आता कारवाई केली जाणार आहे. विनापरवाना वाहनांमध्ये बदल करणे कायद्याने गुन्हा आहे. फॅन्सी नंबर प्लेटमुळे पोलिसांना कारवाईच्या वेळी अनेक अडचणी येतात. तर सायलंसर बदलल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत असल्याने आता दुचाकीस्वारांसह आता दुकांदारांवर देखील कारवाई केली जाणार आहे.

मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 52 नुसार वाहनांमध्ये विना परवानगी फेरबदल करणे, केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नियम 50, 51 अन्वये वाहनाची नंबर प्लेट बदलणे गुन्हा असल्याचे सांगण्यात आले आहे. या नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. अनेक गुन्हेगार बनावट नंबर प्लेट किंवा फॅन्सी नंबर प्लेट वाहनांना बसवून त्यांचा गुन्ह्यामध्ये वापर करतात. त्यामुळे अशी वाहने व आरोपी तात्काळ मिळून येत नाहीत. त्याचप्रमाणे नंबर प्लेटचा बोध न झाल्याने मोटार वाहन कायद्यानुसार करण्यात येणाऱ्या कारवाईत व्यत्यय येतो.

तसेच दुचाकी वाहनांच्या सायलंसरमध्ये (विशेषतः बुलेट सायलेन्सर) बदल करून सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांसारखा आवाज करुन नागरीकांचे स्वास्थ्य बिघडवले जाते. यामुळे वाहतुकीच्या नियमांचेही उल्लंघन केले जाते. वाहन चालक विनापरवाना वाहनामध्ये फेरबदल करीत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.

मोटार वाहन नियमामध्ये नमूद केल्याप्रमाणेच व निकषांनुसार नंबर प्लेट बनवावी. फेन्सी नंबर प्लेट बनवू नये. नंबरप्लेट बनवतेवेळी संबंधीत वाहनाचे कागदपत्र अथवा आरसी बुकची छायांकीत प्रत संग्रही ठेवावी. व यासाठी स्वतंत्र रजिस्टर ठेऊन त्यामध्ये नंबर प्लेट नुसार वाहनांच्या नोंदी ठेवाव्यात, अशा सूचना आणि आवाहन सर्व नंबर प्लेट बनविणाऱ्या दुकानदारांना वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

तसेच दुचाकी गॅरेजचे चालक/मालक यांनी परिवहन विभागाच्या पूर्व परवानगी शिवाय कोणत्याही दुचाकी वाहनाच्या मूळ साच्यामध्ये फेरबदल करु नयेत. विशेषतः बुलेट सायलंसर बदलून देऊ नयेत. वाहनामध्ये बेकायदेशीर फेरबदल केल्यास तसेच खऱ्या नंबरप्लेट ऐवजी फॅन्सी नंबर प्लेट बवनवून दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत आस्थापनेवर आणि आस्थापना चालक/मालक यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.