प्रॉपर्टी कार्डवर सोसायटीचे नाव आवश्यक

0
336

जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांचे चिंचवडला प्रतिपादन

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) : ” एखाद्या सोसायटीचे कन्व्हेयन्स डीड झाले तरी जोपर्यंत प्रॉपर्टी कार्डवर सोसायटीचे नाव येत नाही, तो पर्यंत कायदेशीरदृष्ट्या इमारतीवर सोसायटीची पूर्णपणे मालकी होत नाही. त्यासाठी तीन ते चार टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण करावी लागते, ” असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांनी शनिवारी चिंचवड येथे केले.

महाराष्ट्र राज्य सरकारचे सहकार खाते, ऍड. प्रज्ञा पाटील आणि तिरुपती इंडस्ट्रियल सर्विसेस प्रा. ली. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स), सोसायट्यांचा पुनर्विकास, वाहनतळ (पार्किंग), सोसायटी देखभाल ‘ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे श्री. आघावसाहेब बोलत होते. चिंचवड येथील एस. के. एफ. एम्प्लॉइ हॉल येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून सहकारी संस्था पुणे शहर ३ चे उपनिबंधक श्री. नवनाथ अनपट-भोसलेसाहेब, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपअभियंता श्री. विजय भोजने आदींसह कार्यक्रमाचे प्रायोजक तिरुपती इंडस्ट्रियल सर्विसेस प्रा. ली.चे पंकज थोरात उपस्थित होते.

श्री. आघाव म्हणाले, ” मालमत्ता सोसायटीच्या नावाने व्हायला हवी. सोसायटीच्या नावे असलेले वीज देयक, महापालिकेचे पाणी देयक हे दुय्यम पुरावे आहेत. त्यासाठी प्रॉपर्टी कार्डवर जोपर्यंत नाव येत नाही तोपर्यंत मालमत्ता सोसायटीच्या नावावर होत नाही. एखाद्या इमारतीला पूर्णत्वाचा दाखला नसला तरी मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) करता येते. आवश्यक ठिकाणी तज्ज्ञ वकिलांची मदत घ्यावी. मालमता बांधकाम व्यावसायिकाच्या नावे असल्याने अशा मालमत्तावर काही बांधकाम व्यावसायिकांनी कर्ज काढल्याच्या घटना घडल्या आहेत. सोसायटी स्थापन झाल्यावर चार महिन्यात कन्व्हेयन्स डीड व्हायला हवे.
सरकारने ‘ तंटामुक्त सोसायटी योजनेचा लाभ घेण्यासाठी उपनिबंधकांच्या कार्यालयात सोसायटीने केवळ एक अर्ज द्यावयाचा असतो. पण तो अर्जसुद्धा अनेक सोसायट्या देत नाहीत.”

”’ भाडेपट्टा करार ‘ या विषयी अनपट-भोसले साहेब म्हणाले, ” कन्व्हेयन्स डीड करण्यासाठी अनेक सोसायट्या पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे लागते. पिंपरी-चिंचवडमध्ये भाडेपट्टा तत्वावर जागा देऊन मोठ्या प्रमाणात घरे बांधलेली आहेत. भाडेपट्टा करार आणि
कॉन्व्हेयन्स डीड या दोन्ही बाबी जवळपास सारख्याच आहेत. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आता बरखास्त झाले आहे. त्यामुळे आता तेथील रहिवाशांना आता इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेशी संपर्क साधावा लागणार आहे.”

‘ सोसायट्यांचे पार्किंग ‘ या श्री. भोजनेसाहेब म्हणाले, ” पार्किंग संदर्भात नागरिकांनी इमारतीचा मंजूर आराखडा यासह अन्य आवश्यक कागदपत्रांसह एखाद्या वास्तुरचनाकारा मार्फत आमच्याशी संपर्क साधावा. वास्तुरचनाकार महापालिकेचे अधिकारी आणि नागरिक यांच्यात दुवा म्हणून काम करेल. त्यामुळे नागरिकांच्या समस्या लवकर सोडविणे शक्य होईल. शहरात माणसे कमी आणि वाहने जास्त झाली आहेत. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पार्किंगवरून वाद होतात.”
ऍड. प्रज्ञा पाटील म्हणाल्या, ” प्राधिकरण, चिखली, पूर्णानगर, तळेगाव एमआयडीसी येथील भाडेपट्टा करार असलेल्या इमारतींच्या कॉन्व्हेयन्स डीड होण्यासाठी सरकारी पातळीवर पाठपुरावा सुरु आहे. मात्र कायदेशीर बाबींमध्येही नागरिक लक्ष देत नाहीत.” पंकज थोरात यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्रिलोक बागुल यांनी उपस्थितांचे आभार मानले.