प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करावा – जिल्हाधिकारी मांढरे

0
401

मालेगाव, दि.२२ (पीसीबी) – सोशल डिस्टन्सींग चे अनुपालन होण्याच्या उद्देशाने मालेगाव येथील विश्रामगृहाच्या आवारातील मोकळ्या जागेत उपस्थित सर्व विभाग प्रमुखांचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते.

बोलताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, मालेगाव शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करावा, भविष्यातील धोके ओळखून सोपविलेल्या जबाबदारीचे काटेकोर नियोजन करावे. सामान्य रुग्णालय हे आता यापुढे नॉन कोवीड रुग्णालय असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेतांना ते म्हणाले, प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी लगतच्या पाचही तालुक्यांमधील शासकीय वाहनांसह कर्मचाऱ्यांची सेवा तात्काळ अधिग्रहीत करण्यात यावी. रुग्ण दाखल होण्यापूर्वीच त्याचे सिडीआर सह कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अपेक्षीत आहेत. महानगरपालिकेमार्फत गठीत करण्यात आलेल्या समितीला सर्वतोपरी सहकार्य मिळेल. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील पाचही तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या टिम तयार करून मालेगाव तालुक्यातील सर्व चेकपोस्टवर नियुक्त करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

यावेळी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, अपर पोलिस अधिक्षक संदीप घुगे, प्रातांधिकारी विजयानंद शर्मा, आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसिलदार चंद्रजित राजपूत, शिवकुमार आवळकंठे, डॉ.गोविंद चौधरी यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.