प्रभाग क्रमांक ४ दिघी बोपखेलमधील विविध विकासकामांचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन…

0
242

पिंपरी, दि.६ – आपल्या भागात काम पुर्ण करण्यासाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक असतात, विकासासाठी झटणा-या लोकप्रतिनिधीमुळे, त्यांच्या प्रशासनासोबतच्या पाठपुराव्यामुळे त्या भागाचा कायापालट होत असतो. विकासाची उणीव भरुन काढण्यासाठी सर्वांना सोबत घेणे आवश्यक असून सर्वांनी चांगले काम करावे असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील दिघी बोपखेल मधील पुणे आळंदी रोड वरील सैनिक भवन जवळ, आय.टु.आर अंतर्गत बहुउद्देशीय इमारत बांधणे व जागा विकसित करण्याच्या कामाचा भुमिपुजन समारंभ आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार महेश लांडगे यांचे हस्ते संपन्न झाला त्यावेळी महापौर माई ढोरे बोलत होत्या.

यावेळी आमदार महेश लांडगे, प्रभाग अध्यक्ष विकास डोळस, कुंदन गायकवाड, नगरसेविका नानी उर्फ हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, माजी नगरसदस्य दत्तात्रय गायकवाड, रामदास कुंभार, मीना पाटील, आशा सुपे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड, डॉ.महेश भारती, डॉ.राजु काळे, कुलदिप परांडे आदी उपस्थित होते.

कोणताही प्रकल्प, उपक्रम अथवा योजना राबविताना त्याचा फायदा समाजातील सर्व घटकांना झाला पाहिजे तरच त्यात खरे समाधान असते. सर्व सामान्य नागरीकांच्या अडीअडचणी लक्षात घेवून विकास कामांचे नियोजन आणि प्राधान्यक्रम निश्चित केले पाहिजे असे नमुद करुन आमदार लांडगे म्हणाले नागरीकांच्या गरजा त्या त्या प्रभागात वेगवेगळया असतात. बहुतेकदा काम करणाऱ्यांवर टीका होत असते. पण कामातुन आपले अस्तित्व दाखवून देणारा लोक प्रतिनिधी सर्व सामान्य जनतेच्या मनात राहतो. त्या भागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी विकासकामे हाती घेतली आणि ती पुर्ण केली तर तेथील नागरीक देखील समाधानी होतात. हेच समाधान अभिमानास्पद असते. नागरीकांना सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्वाची असते. कोरोना काळात लोकप्रतिनिधींनी चांगले काम केले. तसेच जीवाची पर्वा न करता अविरत सेवा देण्या-या डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ आदींनी बजावलेली भुमिका महत्वाची असून त्यांच्या प्रती आमदार लांडगे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

महानगरपालिकेने चांगले काम केले म्हणून या शहराचा महानगरपालिका कामकाजासाठी देशपातळीवर चौथा क्रमांक आला तसेच राहण्यायोग्य शहर म्हणून देशातील १६ वे क्रमांकाचे शहर ठरले त्यामुळे प्रशासनाचे देखील आमदार लांडगे यांनी कौतुक केले.

दिघी येथील बांधण्यात येणार असलेल्या बहुउद्देशीय इमारतीचे क्षेत्रफळ ७२७ चौ.मी.इतके आहे. इमारतीमध्ये वाहनतळ आणि चार मजले उभारण्यात येणार असून त्यामध्ये २६ खाटांचे प्रसुतीगृह, शस्त्रक्रिया कक्ष, सोनोग्राफी रुम, स्वागत कक्ष, प्रतिक्षागृह, डॉक्टर्स रुम, प्रयोगशाळा, औषध दुकान आदींचा समावेश आहे. यासाठी ३ कोटी २२ लाख रुपये इतका खर्च येणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इ प्रभाग अध्यक्ष विकास डोळस यांनी, सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी तर आभार नगरसदस्या निर्मला गायकवाड यांनी मानले. महापौर माई ढोरे यांनी येणा-या ८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.