प्रणव मुखर्जी यांच्या निधानामुळे संघाचे नुकसान

0
229

 मुंबई, दि. १ (पीसीबी) माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आज निधन झालं. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. देशातील राजकीय नेते, संस्था, संघटनांकडून प्रणवदा यांना आदरांजली वाहण्यात आली.

प्रणव मुखर्जींच्या निधनानंतर सरसंघचालक आणि सरचिटणीस सुरेश भय्याजी जोशी यांनी एक संयुक्त पत्रक जारी करत शोक व्यक्त केलाय.  प्रणव मुखर्जी संघासाठी मार्गदर्शक होते. संघटनेबद्दल त्यांना जिव्हाळा होता. त्यांच्या निधनामुळे संघाचे कधीही न भरुन निघाणारे नुकसान झालं आहे, असं या पत्रकामध्ये म्हटलं आहे. दरम्यान, मुखर्जी यांनी कायमच राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिल्याचे सांगत ते आमच्यासाठी मार्गदर्शक होते तसेच त्यांना राजकीय अस्पृश्यता आवडत नव्हती, असंही संघाने म्हटलं आहे.

काँग्रेसचा विचार त्यांनी पुढे नेला – बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी हे भारतीय राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. आपल्या प्रदिर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत त्या पदाचा मान आणि सन्मान वाढवला. प्रणवदांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक पर्व संपलं, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

“प्रणव मुखर्जी हे काँग्रेसचे नेते असले तरी सर्व पक्षातील नेते त्यांच्याकडे सन्मानाने आणि आदराने पाहत. कोणताही वादाचा विषय निघाला तर प्रणवदा हे यशस्वी मधस्थी करायचे. काँग्रेसचा विचार पुढे नेण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. देशासाठीचे त्यांचे योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ने सन्मानीत केलं. त्यांच्या जाण्याने कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. प्रणवदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुखर्जी यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे,” असंही थोरात म्हणालेत.

शरद पवार यांना शोक –

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्यावर सोपवलेल्या कोणत्याही जबाबदाऱ्यांपासून कधीही मागेपुढे पाहिलं नाही. प्रणव मुखर्जी यांनी भारताच्या उन्नतीसाठी पूर्ण निश्चयपूर्वक कार्य केलं, असं ट्विट शरद पवारांनी केलंय. दरम्यान, भारताने एक प्रख्यात राजकारणी आणि शूर मुलगा गमावलाय, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.