प्रकाश आंबेडकरांना ‘चोर’म्हटल्याने रामदास आठवले यांच्या सभेत राडा

0
2318

औरंगाबाद, दि. १५ (पीसीबी) – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या सभेत रिपाइचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद शेळके यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता ‘चोर’ म्हटल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी सभेत खुर्च्यांची फेकाफेक करत राडा घातला. ही घटना सोमवारी (दि.१४) रात्री नऊच्या सुमारास औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या प्रांगणात विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त आयोजित सभे दरम्यान घडली.

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊच्या सुमारास विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या प्रांगणात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिपाइचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद शेळके म्हणाले, ‘शैक्षणिक इमारती उभ्या कराव्यात म्हणून बाबासाहेबांनी येथे जमीन विकत घेऊन ठेवली. पण आंबेडकरांचे नातू ती जमीन विकत आहेत. ते चोर आहेत.’ हे ऐकताच कार्यकर्त्यांनी ‘बाबासाहेबांचा विजय असो, बाळासाहेबांचा विजय असो’ अशा घोषणा देत खुर्च्यांची फेकाफेक केली.

शेळके यांनी ‘मला कोणावरही टीका करायची नाही,’ असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. नंतर आठवले यांनी भाषणात ‘माझ्या पदाधिकाऱ्याने कोणाबद्दलही असे बोलणे मला पसंत नाही, आपण काय बोलतो याचे भान ठेवले पाहिजे,’ असे स्पष्ट केले. गोंधळाची माहिती मिळाल्यावर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.