पोलीस निरीक्षक कणेरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

0
481

अलिबाग, दि.३१ (पीसीबी) –   सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांच्या आत्महत्याप्रकरणी त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी राज्य गुप्त वार्ता विभागातील सहा पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये अतिरिक्त उप्पर आयुक्त नम्रता अलकनुरे, सहाय्यक आयुक्त प्रशांत लांगी, सहाय्यक आयुक्त इनामदार यांच्यासह आर. व्ही. शिंदे, विजय बनसोडे आणि रवींद्र साळवी या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कणेरकर यांनी  १६ ऑगस्ट रोजी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहात गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात वरील सहा अधिकाऱ्यांची नावे होती. कणेरकर हे यापूर्वी राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत होते. २०१८ मध्ये त्यांचे सह अधिकारी प्रशांत लांगी यांचे पाकीट कार्यालयातून चोरीला गेले होते. हे पाकीट चोरल्याचा आरोप कणेरकर यांच्यावर ठेवण्यात आला. या प्रकरणावरून या सर्व अधिकाऱ्यांनी कणेरकर यांची वारंवार बदनामी केली होती. यामुळे कणेरकर यांच्यावर मानसिक दडपण आले होते. दरम्यानच्या काळात प्रशांत कणेरकर यांची राज्य गुप्त वार्ता नियंत्रण कक्षातून रायगड पोलीस दलात बदली झाली. मात्र नैराश्यातून त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. सर्वांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.