पोलिस दलातील सहाय्यक आयुक्त सुहास भोसले यांचं जीममध्ये ह्दयविकाराच्या झटक्याने निधन

0
370

महाराष्ट्र, दि.११ (पीसीबी) : महाराष्ट्र पोलिसांच्या सोलापूर शहर पोलिस दलातील सहाय्यक आयुक्त सुहास भोसले यांचे बुधवारी सकाळी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते सकाळी ऑफिसर जीममध्ये व्यायामासाठी गेले असताना ही दुर्देवी घटना घडली आहे. अत्यंत मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त भोसले सर्वांना परिचीत होते. त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून महाराष्ट पोलिसांच्या सोलापूर पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले हे सोलापूर शहर पोलिस दलात डिव्हिजन -1 या ठिकाणी कर्तव्यास होते. त्यांचे कार्यालय जेलरोड पोलिस स्टेशनमध्ये आहे. अमरावतीहून सोलापूर शहर पोलिस दलामध्ये ते 1 एप्रिल 2021 रोजी रूजू झाले होते. त्यांचे वय 56 होते. सहाय्यक आयुक्त सुहास भोसले यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

नेहमीप्रमाणे भोसले हे बुधवारी सकाळी शहरातील ऑफिसर जीमध्ये व्यायामासाठी गेले होते. त्यांना व्यायाम करताना चक्कर आली होती. त्यानंतर त्यांनी काही वेळ व्यायाम करण्याचे थांबविले होते. अत्यल्प विश्रांतीनंतर लागलीच त्यांनी व्यायामास सुरूवात केली. त्यावेळी त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याची माहिती सांगण्यात येत आहे. वयाच्या 56 व्या वर्षी सहाय्यक आयुक्त सुहास भोसले यांचे निधन झाले आहे. त्यामुळे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर बढती मिळण्यापुर्वी सुहास भोसले हे पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात तसेच पुणे शहर पोलिस दलामध्ये कार्यरत होते. खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून देखील त्यांनी कर्तव्य बजाविलेले होते.