“पोलिसांनी शिवाजी महाराज आणि जिवा महालाचा आदर्श घ्यावा”

0
636

नवी दिल्ली,दि.६(पीसीबी) – पोलिसांनी शिवाजी महाराज आणि जिवा महालाचा आदर्श घ्यावा असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे. गुरूग्राममध्ये आयोजित केलेल्या पोलिसांच्या कार्यक्रमात अजित डोवाल बोलत होते.

शिवाजी महाराज हे कुशल नेतृत्त्वाचे उत्तम उदाहरण आहेत. एकदा घोड्यावरुन जात असताना महाराजांनी एका व्यक्तीला दांडपट्टा फिरवून उडते पक्षी मारताना पाहिले. त्याला त्यांनी आपल्या सैन्यात सहभागी करून घेतले. प्रशिक्षण दिले. त्याचे नाव जीवा महाला होते, असं डोवाल यांनी पोलिसांना सांगितलं.

जीवा महाला याच्यात काय क्षमता आहे याची पूर्ण कल्पना छत्रपती शिवाजी महाराजांना होती. आपल्या माणसाचे कौशल्य अशा प्रकारे विकसित करायला हवे की प्रत्येक पोलीस जीवा महाला यांच्या सारखा झाला पाहिजे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, अजित डोवाल यांनी पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती, संगठन कौशल्य आणि माणसांची पारख करण्याची त्यांची कला याविषयी माहिती करुन दिली. तसेच सर्वांनी शिवरायांचा आदर्श समोर ठेवावा असंही त्यांनी सांगितलं.