पुनावळेकरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिलासा!

0
342

पुनावळेकरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिलासा!

प्रस्तावित कचरा डेपोप्रकरणी आयुक्तांसोबत घेणार बैठक

ग्रामस्थ, सोसायटीधारक आणि प्रशासनाशी चर्चा करुन काढणार तोडगा

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पुनावळे येथील प्रस्तावित कचरा डेपोबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळासोबत पुण्यात बैठक घेवून तोडगा काढला जाईल, असे आश्वासर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यामुळे पुनावळेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

पुनावळे गावाचा समावेश १९९९ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत करण्यात आला. अद्याप या गावातील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम झालेल्या नाहीत. महापालिका विकास आराखड्यानुसार, या गावातील मोकळ्या जागेत कचरा डेपोचे आरक्षण आहे. परंतु, सभोवताली मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प निर्माण झाले असून, महाराष्ट्रासह देशातील कानाकोपऱ्यातून या भागात नागरिक वास्तव्यास आले आहेत. त्यामुळे या डेपोला स्थानिक नागरिकांसह सोसायटीधारकांनी तीव्र विरोध केला आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी ‘‘मी पुनावळेकर’’ ही मोहीम हाती घेतली असून, नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी नागरिकांची बाजू मांडण्यात आली. तसेच, निवेदनही देण्यात आले. यावेळी पुनावळे ग्रामस्थ व सोसायटीधारक प्रतिनिधी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून पुनावळेत कचरा डेपा सुरू करण्याबाबत प्रशासकीय हालचाली सुरू आहेत. त्यामुळे या भागातील सुमारे ३० हजार नागरिक चिंतेत आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी गृहप्रकल्प बांधून पूर्ण केले आहेत आणि सदनिकाधारक नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हिंजवडी आयटी हबला लागूनच हा डेपो निर्माण होणार असल्यामुळे आयटी आणि उच्चशिक्षित लोकांमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधींबाबत नाराजाचीचा सूर आहे.
**
आरक्षण स्थलांतर करा : ग्रामस्थांची मागणी
वास्तविक, कचरा डेपो ही शहराची गरज आहे. त्यामुळे हा डेपो रद्द करावा, अशी मागणी व्यवहार्य नाही. परंतु, लोकहित लक्षात घेता सदर कचरा डेपोचे आरक्षण पर्यायी शासकीय जागेत करावे. ज्या ठिकाणी भविष्यत गृहप्रकल्प होणार नाहीत. तशी जागा आम्ही ग्रामस्थ प्रशासनाला सूचवण्याची तयारी ठेवली आहे. कचरा डेपो रद्द न करता कायदेशीर बाबींच्या आधारे कचरा डेपो आरक्षण स्थलांतर करण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी घेतली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, उद्या शुक्रवारी पुणे येथे महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि ग्रामस्थ व सोसायटीधारकांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करू आणि दोन्ही बाजू ऐकून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीकडे पुनावळेकरांचे लक्ष लागले आहे.