पुण्यात चारित्र्याच्या संशयातून प्रियकराने चिरला प्रेयसीचा गळा

0
941

पुणे, दि. २४ (पीसीबी) – प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्रियकराने तिचा गळा चिरुन खून केला. यानंतर स्वत:ही आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहून फरार झाला. ही घटना आज (रविवार) पुण्यातील नऱ्हे येथून समोर आली.

सोनाली आनंदराव भिंगारदिवे (वय २३, मूळ रा. विजयनगर, कराड) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी प्रियकर सोमेश घोडके याच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली नऱ्हे येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिचे सोमेश सोबत प्रेम संबंध होते. मात्र सोमेश वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच त्याने तिचा गळा चिरुन खून केल्याचे बोलले जात आहे. सोनाली मंगळवार (दि.१९) पासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसांकडे केली होती. याप्रकरणी पोलीस संशयित आरोपी सोमेशचा शोध घेत आहेत. तपासा दरम्यान मृतदेह जवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये सोमेश देखील आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख केला आहे. आज सकाळी घरातून उग्र वास येऊ लागल्याने नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली तेव्हा हा प्रकार समोर आला. सिंहगड पोलीस आरोपी प्रियकर सोमेशचा शोध घेत आहेत.