पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी ५ कोटी खर्च करण्याची तयारी ठेवा – अशोक चव्हाण 

0
2834

पुणे, दि. २७ (पीसीबी) – पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाला द्यायचा याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अद्याप एकमत झालेले नसताना काँग्रेस हा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे.     

पुण्यातून निवडणूक लढायची असेल, तर ५ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी ठेवा, असा सल्ला  चव्हाण यांनी पुण्यातील काँग्रेसच्या  इच्छुक उमेदवारांना  दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार असणार, हे स्पष्ट होत आहे.

पुण्यातून माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार अनंत गाडगीळ, शहराध्यक्ष अभय छाजेड, माजी आमदार मोहन जोशी आणि महापालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता पक्षश्रेष्ठी कोणाच्या गळ्यात उमेदवारीचे माळ घालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढण्याची तयारी  आहे, असे जेष्ठ नेते उल्हास पवार यांनी म्हटले आहे. येत्या २९ आणि ३० जानेवारीला पक्षाच्या राज्य पार्लमेंटरी बोर्डाची बैठक मुंबईत होणार आहे.