पुण्यातील नवउद्यमींमध्ये गेल्या आठ वर्षांत दीड हजार दशलक्ष डॉलर्सहून अधिक गुंतवणूक

0
201

पुणे दि. २० (पीसीबी) -गेल्या आठ वर्षांत पुण्यातील नवउद्यमींमध्ये दीड हजार दशलक्ष डॉलर्सहून अधिक गुंतवणूक झाली आहे. त्यापैकी जवळपास ५० टक्के, म्हणजे ७७३.९४ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक २०२० आणि २०२१ या दोनच वर्षांत झाली आहे. त्यामुळे करोना काळात आर्थिक अडचणी निर्माण होऊनही गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक गुंतवणूक करोना काळातील दोन वर्षांतच झाल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड एंटरप्राइज आणि पॉझिव्ह्यू व्हेंचर्स यांनी संयुक्तरीत्या पुण्यातील नवउद्यमींमध्ये झालेल्या गुंतवणुकीचा अभ्यास करून ‘इन्व्हेस्टर सेंटिमेन्ट्स अँड इमर्जन्स ऑफ टायर २ सिटी – पुणे ॲज स्टार्टअप डेस्टिनेशन’ अहवाल तयार केला आहे. या अभ्यासगटामध्ये केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, सनदी लेखापाल विनित देव आणि सनदी लेखापाल प्राजक्ता शेट्ये देव यांचा समावेश आहे. या अभ्यासात २१४ ते २०२१ या आठ वर्षांत पुण्यातील नवउद्यमींमध्ये झालेल्या गुंतवणुकीचा तपशील देण्यात आला आहे. या काळात गुंतवणुकीचे एकूण १४४ व्यवहार झाले. त्यातील ६८ व्यवहार केवळ २०२० आणि २०२१ या दोन वर्षांत झाले. आठ वर्षांत गुंतवणुकीचे सर्वाधिक व्यवहार २०१९ (२३) आणि २०२१ (५१) या दोन वर्षांत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.