पुण्यातील तिन्ही गोल्डमॅन ठरले अल्पायुषी

0
1345

प्रतिनिधी दि ०६ (पीसीबी) : पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन व उद्योजक सम्राट मोझे यांचे आज हृद्यविकाराने निधन झाले. अवघ्या ३९ व्या वर्षी त्यांचे अचानकपणे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आत्तापर्यंत प्रसिद्धीस आलेले पुण्यातील गोल्डमॅन अल्पायुषी ठरल्याचे दिसून आले आहे.

३९ वर्षीय सम्राट मोझे या तरुणाचे हृद्यविकाराने निधन झाले. अंगावर भरपूर सोने घालत असल्यने गोल्डमॅन या नावाने सम्राट मोझे प्रसिद्धीस आले होते. यापूर्वी मनसे आमदार कैं रमेश वांजळे यांना गोल्डमॅन म्हणून ओळखले जात होते. आमदारपदी निवडून येण्याआधिच वांजळे यांची गोल्डमॅन अशी ओळख होती. पुणे जिल्ह्यातील खडकवासला मतदारसंघातून वांजळे विधानसभेत मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. आमदार पदाची शपथ घेताना मराठीत शपथ घ्यावी यासाठी आमदार आबु आझमी यांच्याविरुद्ध गोल्डमॅन वांजळे यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे त्यांना राज्यभरात प्रसिद्धी मिळाली. आमदारपदाची त्यांची कारकीर्द गाजणार असे वाटत असतानाच सन २०११ साली हृद्यविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यु झाला. अवघ्या ४५ व्या वर्षी मृत्यु झाल्याने गोल्डमॅन वांजळे अल्पायुषी ठरले.

गोल्डमॅन वांजळे नंतर भोसरीतील दत्ता फुगे यांना गोल्डमॅन म्हणून प्रसिद्धी मिळाली. गोल्डमॅन दत्ता फुगे यांनी सोन्याचा शर्टच शिवून घेतला. सुमारे १.२७ कोटी रुपये किंमतीच्या या सोन्याच्या शर्टाला ७ स्वाॅरोस्की क्रिस्टलचे बटन होते आणि सोन्याचा बेल्ट देखील होता. जगभरातील सर्वात महागडा शर्ट शिवून घेतला असल्याने गोल्डमॅन दत्ता फुगे यांची सन २०१६ साली गिनिज बुकमध्ये नोंद देखील झाली. परंतु व्यवहारीक वादातून सन २०१६ मध्ये गोल्डमॅन दत्ता फुगे यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. वयाच्या ४८ व्या वर्षी मृत्यु झाल्याने गोल्डमॅन दत्ता फुगे सुद्धा अल्पायुषी ठरले. रमेश वांजळे, दत्ता फुगे पाठोपाठ सम्राट मोझे असे पुण्यातील हे तीन गोल्डमॅन अल्पायुषी ठरल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.