पुण्याची तृप्ती धोडमिसे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात १६वी

0
597

पुणे, दि. ६ (पीसीबी) – सध्याच युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे असून प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपल्याला आयटी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी मिळावी. असच एक स्वप्न पुण्यातील तृप्ती धोडमिसे या तरुणीने २०१० साली पाहिल होत. पण त्यावेळी तिने प्रोडक्शन इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यावर न थांबता पुढे जाऊन स्पर्धा परिक्षा देण्याचा तिने निर्णय घेतला. पहिल्या प्रयत्नात तिला अपयश आले. पण दुसर्‍या प्रयत्नात तृप्तीला यश मिळाले. तृप्तीला आपल्या कर्म भूमीत म्हणजेच पुण्यात सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून काम पाहण्याची संधी मिळाली. त्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली आणि आज निकाल जाहीर झाल्यावर त्यामध्ये देशात १६ वा क्रमांक तृप्तीने मिळवला.

तृप्ती धोडमिसे ह्यांच्या घरची परिस्थिती अगदी सर्व सामान्य कुटुंबा प्रमाणे होती. तिचे आई आणि बाबा प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून होते. त्यामुळे ती लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. तर तिने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत १० आणि ११ वा क्रमांक मिळविला. त्यानंतर प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवीचे शिक्षण घेतले. त्याच दरम्यान स्पर्धा परिक्षा दिली. त्यामध्ये तिला चांगले यश मिळाले आणि सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून पुण्यात रुजू झाल्या. त्यानंतर तृप्ती यांचा विवाह सुधाकर नवत्रे यांच्याशी झाला. तरी देखील त्यांनी आपले काम आणि घरची जबाबदार सांभाळत परिक्षा देण्याचे ठरविले आणि त्यामध्ये चांगले यश तृप्तीने मिळविल्याने सर्व स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे.

या बाबत तृप्ती धोडमिसे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, मी आज ही प्रशासकीय सेवेत असून पण या परीक्षेचा अभ्यास करताना घर, ऑफिस आणि अभ्यास यांच योग्य नियोजन केल्यामुळे मला यश मिळवता आले. यामध्ये मला सासर आणि माहेरच्या मंडळीनी खूप सहकार्य केल्याने मी यशस्वी होऊ शकले अशी भावना तिने व्यक्त केली.