पिंपळे निलख आणि विशालनगर साठी स्वतंत्र दोन पाण्याच्या टाक्या उभारा : सचिन साठे

0
207

पिंपरी,दि. १२(पीसीबी) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची लोकसंख्या मागील काही वर्षापासून झपाट्याने वाढत आहे. ही लोकसंख्या २५ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करणे ही मनपा प्रशासनाची कायदेशीर जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शहरात पाणी समस्येने उग्ररुप धारण केले आहे. त्यामुळे शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

पिंपळे निलख मध्ये मागील पंधरा वर्षापुर्वी वीस लाख लिटर क्षमतेची पाण्याची एक टाकी उभारण्यात आली आहे. सद्यपरिस्थितीत येथील लोकसंख्या चाळीस हजारांपेक्षा जास्त झाली आहे. या परिसरालाही दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे येथील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. या परिसरातील लोक प्रतिनिधी आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे या भागातील पाणी समस्या गंभीर झाली आहे. शहरातील पाणी प्रश्नावर पुढील पंचवीस वर्षांचे नियोजन करण्याबाबत आणि त्याची अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. शहराला सद्यपरिस्थितीत पवना धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. पवना धरण क्षेत्रात मागील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पवना धरणही पुर्ण क्षमतेने भरले होते. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अद्यापही शहरात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पिंपळे निलख आणि विशालनगर परिसरातही दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहे.

यावर पर्याय म्हणून पिंपळे निलख आणि विशालनगर येथे वीस लाख लिटर क्षमतेच्या दोन स्वतंत्र पाण्याच्या टाक्या उभाराव्यात अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव सचिन साठे यांनी सोमवारी (दि. ११ एप्रिल) क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या जनसंवाद सभेत केली असून तसे मागणीचे पत्र त्यांनी आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनाही दिले आहे.