पिंपळेसौदागरमध्ये पाण्याच्या दोन टाक्या उभारण्याचे काम लवकर सुरू करा; राष्ट्रवादीच्या नगरसेवक दाम्पत्याची मागणी

0
949

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – पिंपळेसौदागर प्रभाग क्रमांक २८ मधील नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी योग्य नियोजन केले जात नाही. पाण्याचा कमी पुरवठा होत आहे. त्यामुळे या भागासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाण्याच्या दोन टाक्यांचे काम लवकरात लवकर सुरू करून पिंपळेसौदागरमधील पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे आणि नगरसेविका शीतल काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात नाना काटे आणि शीतल काटे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर येथील लोकसंख्येचा विचार करता सध्या गावठाणातील एकाच पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे येथील नागरिकांना पाणी योग्य प्रमाणात मिळत नाही. रहाटणी, पिंपळेसौदागर हा प्रभाग क्रमांक २८ चा स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट झाला आहे. तरीही पाण्याचे योग्य नियोजन होत नाही. आम्ही अनेक वर्षापासून नवीन पाण्याच्या टाकीची मागणी करीत होतो. त्यामुळे वर्षभरापूर्वी पिंपळेसौदागरसाठी दोन पाण्याच्या टाक्या मंजूर केल्या. निविदा काढल्या. सर्व साहित्य आले. परंतु काम शून्य प्रगतीपथावर आहे. त्यामुळे यात कोणाचा स्वार्थ लपलाय का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पिंपळेसौदागरमधील पाण्याची समस्या पाहता आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून अमृत योजनेतून पाण्याची टाकी रोझलँड सोसायटी शेजारील नव्याने विकसित होत असलेल्या राजमाता जिजाऊ उद्यानमधील जागेत ६ महिन्यापूर्वी मंजूर करून घेतली आहे. प्रत्यक्षात जागेवर टाकीचे सर्व साहित्य येवून पडले आहे. तरी अद्याप काम चालू झालेले नाही. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रार करून सुद्धा ते या तक्रारीकडे वारवार दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे तांबे यांची बदली करण्यात यावी. त्यांच्याजागी नवीन सक्षम अधिकारी नेमण्यात यावा. सध्या पिंपळे सौदागर येथील नागरिकांना पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. पाण्याची समस्या गंभीर झालेली आहे. आपण वैयक्तिक लक्ष घालून महापालिकेने मंजूर केलेल्या दोन पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरु करण्याचे आदेश देवून टाकीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.”