पिंपळेसौदागरमधील लिनिअर अर्बन गार्डनला शिवाजी महाराजांचे नाव; ड प्रभाग समिती सभेत ठराव मंजूर

0
712

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – पिंपळेसौदागरमध्ये कोकणे चौक ते स्वराज गार्डन चौक दरम्यान उभारण्यात येत असलेल्या लिनिअर अर्बन गार्डनला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव “ड” प्रभाग समिती सभेत शुक्रवारी (दि. १) मंजूर करण्यात आला. पिंपळेसौदागरचे नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी या गार्डनला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली होती. त्याबाबत ड प्रभाग सभेत ठराव मंजूर करण्यात आल्याने नगरसेवक काटे व नगरसेविका कुटे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पिंपळेसौदागर येथील लिनिअर अर्बन गार्डनचे काम वेगाने सुरू आहे. परदेशातील उद्यानांच्या धर्तीवर पिंपळेसौदागरमधील कोकणे चौक ते स्वराजगार्डनदरम्यान साकारण्यात येणारे हे उद्यान शहरातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असणार आहे. हे उद्यान पिंपरी-चिंचवडच्या वैभवात भर घालणारे आहे. पिंपळेसौदागरमध्ये वाकड ते नाशिक फाटा या बीआरटीएस मार्गाला समांतर पावणेदोन किलोमीटर परिसरात लिनिअर अर्बन गार्डन उभारण्यात येत आहे. सुमारे साडेअकरा कोटी रुपये खर्च करून हे उद्यान विकसित केले जात आहे. हिंजवडी आयटी पार्कमुळे पिंपळेसौदागर परिसराचा अवघ्या दहा वर्षांत झालेला कायापालट झाला आहे. झपाट्याने विकसित झालेल्या आणि उच्चभ्रू असलेल्या या परिसराला साजेशे उद्यान असावे या उद्देशाने परदेशातील उद्यानांच्या धर्तीवर हे उद्यान साकारले जात आहे.

या उद्यानात जॉगिंग ट्रॅकपासून ते वॉकिंग ट्रॅकपर्यंतची सुविधा आहे.तसेच नागरिकांसाठी पावणेदोन किलोमीटर परिसरात ४२ विश्रांती कक्ष असतील. कोकणे चौक ते स्वराज गार्डन चौक एचसीएमटीआरमध्ये होणाऱ्या लिनिअर अर्बन गार्डनला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी मागणी केली होती. त्यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनही देण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी “ड” प्रभाग समिती सभेत श्री छत्रपती शिवाजी महाराज लिनिअर अर्बन गार्डन असे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.