पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्यासह आणखी पाच कार्यकारी अभियंत्यांची पदोन्नती

0
321

पिंपरी, दि.३० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांना उपायुक्त, प्रशांत शिंपी यांना सहाय्यक संचालक नगररचना यांच्यासह पाच कार्यकारी अभियंत्यांसह शहर अभियंतापदी (स्थापत्य) उपसूचनेद्वारे पदोन्नती देण्यास महासभेने मान्यता दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेची जुलै महिन्याची तहकूब सर्वसाधारण सभा आज (गुरुवारी) ऑनलाइन पार पडली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र मंडपे, डॉ. शिवाजी ढगे, डॉ. अलवी सय्यद नासेर इब्राहीम यांना ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी बढती देण्याबाबतचा प्रस्ताव विषयपत्रिकेवर होता. या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपने उपसूचना दिली.

महापालिका नगररचना विभागातील प्रशांत शिंपी यांना सहाय्यक संचालक नगररचना या पदावर पदोन्नती दिली. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांना सेवाज्येष्ठता, अनुभव, शैक्षणिक पात्रतेनुसार उपायुक्तपदी पदोन्नती देण्यात आली. प्रशासन अधिकारी दिलीप आढारी, वामन नेमाणे यांना सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती दिली.

महापालिका आस्थापनेवर सह शहर अभियंता (स्थापत्य) पाच पदे आहेत. महापालिका सेवा नियम 2020 नुसार सह शहर अभियंता पदाची शैक्षणिक अर्हता, अनुभव नमुद आहे. त्यानुसार कार्यकारी अभियंता मनोज सेठिया, राजेंद्र राणे, शिरीष पोरेड्डी, ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे यांना रिक्त होणा-या जागेवर सह शहर अभियंतापदी पदोन्नती देण्यास महासभेने उपसूचनेद्वारे मान्यता दिली. ग्रंथपाल कम लिपीक योगिता पाटील यांना लिपीक या पदांमध्ये समावेशन करण्यास मान्यता दिली. डॉ. यशवंत इंगळे यांच्या पदोन्नतीसाठी शैक्षणिक अर्हता शिथील करण्यास आणि त्यांच्याकडे वायसीएम रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक किंवा वैद्यकीय उपअधीक्षक पदाचा पदभार देण्यास मान्यता दिली. डॉ. संजय सोनेकर यांना ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी पदोन्नती आणि अन्नपर्यवेक्षक दिलीप करंजखेले यांना महापालिका अस्थापनेवर समकक्ष पदावर नेमणूक देण्यास उपसूचनेद्वारे मान्यता दिली.