पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार “अंधेर नगरी चौपट राजा”; एका चार मजली इमारतीला १२ वर्षांपासून कर आकारला नाही

0
607

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार म्हणजे “अंधेर नगरी चौपट राजा” अशीच अवस्था आहे. महापालिकेने चिंचवड, बिजलीनगर येथील ४८ खोल्या असलेल्या एका चार मजली इमारतीला तब्बल १२ वर्षांपासून एक रुपयाचाही कर आकारला नसल्याचे माहिती अधिकारांतर्गत समोर आले आहे. ही इमारत महापालिकेच्या एका माजी विरोधी पक्षनेत्याची असल्याने महापालिका प्रशासनाने कर आकारण्याचे धाडसच केले नसल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे या ४८ घरांना महापालिकेचे पाणी फुकट दिले जाते. तसेच फक्त दोन वीजमीटरवरून ४८ घरांना वीजपुरवठा करण्यात आला आहे. घरमालक भाडेकरूंकडून भाड्यासोबत पाणी आणि विजेचे बिल सुद्धा वसूल करत आहे. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर शहरातील सर्वसामान्य करदात्यांच्या तळपायाची आग मस्तकात जात आहे.

अॅड. सुनील वाल्हेकर यांनी माहिती अधिकारांतर्गत घेतलेल्या माहितीत ही करचोरी आणि महापालिका बड्या धेंड्यांना कशा प्रकारे पाठीशी घालते ही बाब उघडकीस आली आहे. मोजे चिंचवडगाव सर्व्हे क्रमांक १२९ मध्ये १२ वर्षापूर्वी एक चार मजली इमारत उभारण्यात आली आहे. ही इमारत दिवंगत शंकरराव भागुजी वाल्हेकर यांच्या नावे आहे. आता त्यावर माजी विरोधी पक्षनेते तानाजी वाल्हेकर यांचा ताबा आहे. महापालिकेने गेल्या १२ वर्षांत या इमारतीला एक रुपयाचाही कर आकारलेला नाही. या इमारतीत एकूण ४८ खोल्या आहेत. त्या सर्व भाड्याने देण्यात आलेल्या आहेत.

त्यामुळे या इमारतीचा वाणिज्य वापर स्पष्ट होतो. त्यानुसार या इमारतीला महापालिकेने करआकारणी करून ती कायद्याने वसूल करणे गरजेचे होते. परंतु, माजी विरोधी पक्षनेत्याच्या या इमारतीला महापालिकेने १२ वर्षांपासून अभिय दिलेले आहे. एवढेच नाही तर या इमारतीतील ४८ घरांना महापालिकेचे पाणी फुकट दिले जात आहे. एक रुपयाही पाणीपट्टी वसुल केले जात नाही. त्यामुळे गेल्या १२ वर्षांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टीपोटी कोट्यवधी रुपयांवर महापालिकेने पाणी सोडले आहे.

हेच एखाद्या सामान्य नागरिकाने केले असते, तर कायद्याचा बडगा उगारून त्याचा मानसिक छळ करून महापालिकेने त्याच्याकडून कर आणि पाणीपट्टीचे पैसे वसूल केले असते. यासंदर्भात महापालिकेच्या करआकारणी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याला विचारले असता माजी विरोधी पक्षनेते तानाजी वाल्हेकर यांचा ताबा असलेल्या संबंधित चार मजली इमारतीला मिळकतकर आकारण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. तानाजी वाल्हेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

ही बाब माहिती अधिकारांतर्गत उघडकीस आणणारे अॅड. सुनील वाल्हेकर म्हणाले, “एखाद्या सामान्य करदात्याने कर बुडवला असता तर महापालिकेने त्याच्या घरासमोर ढोल वाजवून, त्याला कायदेशीर नोटिस पाठवून कर वसूल केला असता. परंतु, या प्रकरणात मात्र महापालिकेने मूग गिळून गप्प बसणे पसंत केले आहे. तब्बल १२ वर्षे कर न आकारल्याप्रकरणी महापालिकेच्या करआकारणी व मिळकतकर विभागातील आतापर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.”