पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आता ‘अशा’ आधुनिक पद्धतीने मिळणार शिक्षण

0
255

पिंपरी, दि.०८ (पीसीबी) : विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेला वाव देण्यासाठी आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शालेय अभ्यासक्रम शिकण्यासाठी टॅब देण्यात येणार आहे. त्या माध्यमातून 1 ली ते 10 वी पर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर त्या टँबमध्ये अपलोड केले जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता सुद्धा दिली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण 105 प्राथमिक शाळा असून त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दु शाळांचा समावेश आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. कोरोनाचा धोक्या कायम असल्याने आणि तिसरी लाट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने शिक्षक शिकवत आहे. परंतू, त्यामध्ये अनेक अडचणी येतात. महापालिका शाळेतील विद्यार्थी हे जास्त संख्येने झोपडपट्टी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. त्यांच्या पालकाकडे स्मार्ट फोन नसतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

आधुनिक पद्धतीने शालेय अभ्यासक्रम शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहे. त्या माध्यमातून 1 ली ते 10 वी पर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर त्या टँबमध्ये अपलोड केले जाणार आहे. राज्य शासनाच्या अभ्यासक्रमावर आधारित बालभारतीचे मंजूर केलेल्या नामांकित संस्थेने, ज्यांनी जिल्हा परिषद, शिक्षण संस्था, इतर महापालिकेला व स्मार्ट सिटीला शाळेय अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर पुरविले आहेत, अशा संस्थेकडून 1 ली ते 10 च्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर (ई-लर्निग साहित्य) देण्यात येणार आहे.