पिंपरी-चिंचवड प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी आता ‘ही’ कडक पावले

0
449

पिंपरी, दि.२२ (पीसीबी) : राज्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड या ठिकाणी कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ही शहर पुन्हा एकदा कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसात 1400 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कठोर पावलं उचलली जात आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. या नव्या आदेशानुसार, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येनुसार वर्गीकरण करण्यात येणार आहे. यात अ, ब, क असे तीन विभाग असणार आहे. हे तीन भाग यलो, ऑरेंज आणि रेड झोन असणार आहे. यात त्या-त्या परिसरात संबंधित झोनबाबतचे फलक लावले जाणार आहेत.

अ – एकूण लोकसंख्येच्या 5% पेक्षा कमी रुग्णसंख्या आढळलेल्या परिसरास पिवळा भाग (यलो झोन)
ब – एकूण लोकसंख्येच्या 5 ते 20% रुग्णसंख्या आढळलेल्या परिसरास नारंगी भाग (ऑरेंज झोन)
क – एकूण लोकसंख्येच्या 20% पेक्षा जास्त रुग्णसंख्या आढळलेल्या परिसरास लाल भाग (रेड झोन) घोषित करण्यात येणार.

त्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विनामास्क वावरणे, सुरक्षित अंतर न ठेवणे, सॅनिटायजरची सुविधा न करणे याचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी 8 भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

आठ क्षेत्रीय कार्यालयात वॉर रूम
तसेच भाजी मंडई, बाजार पेठ, मजूर अड्डे यांसह इतर गर्दीच्या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं पालन केले जातंय का? यावरही नजर ठेवली जाणार आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापना सील कराव्यात, असेही आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईसाठी स्वतंत्र 8 पथकं नेमण्यात आली आहेत. यात पोलिसांचा समावेश असेल.

त्याशिवाय पिंपरी चिंचवडमध्ये आठ क्षेत्रीय कार्यालयात वॉर रूम तयार केल्या जाणार आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्ती वाढवण्यात आल्यात. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या नियमांची आठवण करून देण्यासाठी रिक्षा, टेम्पोद्वारे जनजागृती केली जाणार आहे.