पिंपरी चिंचवड उपमहापौर पदासाठी भाजपाकडून हिराबाई घुले

0
874

– राष्ट्रवादीची उमेदवारी पंकज भालेकर यांना

पिंपरी, दि.१९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड उपमहापौर पदासाठी जेष्ठ नगरसेविका नानी तथा हिराबाई गोवर्धन घुले यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. बोपखेल- दिघी प्रभाग क्रमांक ४ मधून त्या भाजपा उमेदवार म्हणून विजयी झाल्या. कुठल्याही गटातटाच्या राजकारणात न पडता स्वतंत्रपणे काम केल्याचा त्यांना फायदा झाला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने पंकज दत्तात्रेय भालेकर (तळवडे) यांना उमेदवारी दिली आहे. भालेकर हे राष्ट्रवादी च्या उमेदवारीवर तळवडे प्रभागातून विजयी झाले आहेत.

हिराबाई घुले यांनी आज दुपारी आपला उमेदवारी अर्ज नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे दाखल केला. त्यावेळी महापौर माई ढोरे, सत्ताधारीपक्षनेते नामदेव  ढाके, जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे, शर्मिला बाबर, नगरसेवक सागर गवळी, सुरेश भोईर उपस्थित होते.

२३ मार्च (मंगळवार) रोजी सकाळी ११ वाजता महासभेत उपमहौपर पदासाठीची निवडणूक होणार असूण पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल या निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

महापालिकेत १२८ पैकी ७७ भाजपा, ३६ राष्ट्रवादी काँग्रेस,९ शिवसेना, ५ अपक्ष आणि १ मनसे असे नगरसेवकांचे संख्याबळ आहे. भाजपाचे स्पष्ठ बहुमत असल्याने हिराबाई घुले यांची निवड ही तशी औपचारिकता असणार आहे. उपमपौर पदास पाच महिने केल्याने अधिक नगरसेवकांना संधी मिळेल असा निर्णय भाजपाने केला होता. त्यानुसार अडिच वर्षाच्या दुसऱ्या टर्ममध्ये प्रथम तुषार हिंगे (मोरवाडी) यांना नंतर कामगारनेते केशव घोळवे (मोरवाडी) यांनी संधी देण्या आली होती. घोळवे यांचा नुकताच उपमहापौर पदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यांच्या जागेवर कोणाची नियुक्ती होणार याची उत्कंठा लागून राहिली होती. अखेर हिराबाई घुले यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

…तर महापौर पूर्ण काळासाठी का ? –
महापौर पद हे पूर्ण अडिच वर्षाच्या काळासाठी तर उपमहापौर पाच महिन्यांसाठी फिरते ठेवल्याने भाजपाच्या एका गोटात प्रचंड खदखद सुरू झाली आहे. जर का उपमहापौर पाच महिन्यांसाठी असेल तर दुसऱ्या व्यक्तीला संधी मिळावी म्हणून महापौर पदाचाही राजीनामा घ्या, अशीही जोरदार मागणी सुरू झाली आहे.