पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी राष्ट्रवादीला डिवचले; राष्ट्रवादीचे घड्याळ स्लो… लोकसभेच्या उमेदवारांचे गुऱ्हाळ सुरूच

0
3762

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – लोकसभा निवडणूक अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेने राजकीय वातावरण तापवायला सुरूवात केली आहे. मावळ मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून पवार घराण्याबद्दल तोंडसुख घेत राष्ट्रवादीला डिवचले आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या छुप्या मदतीमुळेच बारणे यांना खासदारकी मिळवता आली, हे राजकीय वास्तव आहे. आता त्याच राष्ट्रवादीला बारणे यांनी अंगावर घेतले आहे. त्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दुसरीकडे मावळ आणि शिरूरमध्ये स्वतःला ताकदवान म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजून उमेदवार सापडत नाहीत, हे वास्तव आहे. या दोन्ही मतदारसंघात कोणाला लढवायचे, हेच अजून निश्चित होत नाही. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचे घड्याळ स्लो असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी आता अवघे दीड-पावणेदोन महिने बाकी आहेत. तोंडावर आलेल्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. काही राजकीय पक्षांचे मतदारसंघातील उमेदवार जवळजवळ निश्चित आहेत. तिकीट निश्चित असलेल्या संभाव्य उमेदवारांनी गाठीभेटीद्वारे आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. तिकीट मिळाल्यानंतर अधिकृतपणे प्रचाराचा नारळ फोडण्याच्या औपचारिकतेची वाट न पाहता निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्येही लोकसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेने हे वातावरण तापवले आहे. मावळ मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून बारामतीच्या पवार घराण्याबद्दल तोंडसुख घेतलेआहे. मावळ मतदारसंघात पवार घराण्यातीलच एक उमेदवार असण्याच्या शक्यतेने थोडी धास्ती घेतलेल्या बारणे यांनी राष्ट्रवादीला डिवचले आहे. त्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बारणे यांना खासदार करण्यासाठी राष्ट्रवादीने सुद्धा अंतर्गत मदत केली होती. आता त्याच राष्ट्रवादीला बारणे यांनी अंगावर घेतल्याने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

दुसरीकडे मावळ आणि शिरूरमध्ये स्वतःला ताकदवान म्हणणाऱ्या राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नाहीत, असे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या आधी राष्ट्रवादीने तयारी चालविल्याचे पाहायला मिळते. परंतु, मावळ आणि शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबत संभ्रम आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी शिरूरचा उमेदवार आठ दिवसांत जाहीर करण्याची घोषणा केली होती. त्याला महिना उलटत आला, तरी अद्याप उमेदवाराचा चेहरा नक्की होत नाही. उमेदवारीबाबत राष्ट्रवादीचे घड्याळ स्लो असल्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. उमेदवार लवकर निश्चित न झाल्यास त्याचा पक्षाला फटका बसेल, असे चित्र आहे.