पिंपरी-चिंचवडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन

0
516

पिंपरी, दि. २ (पीसीबी) –   ‘गणपत्ती बाप्पा मोरया’… गणेश गणेश… ‘मोरया रे बाप्पा, मोरया रे’ असा जयघोष… मांगल्यपूर्ण वातावरण… भक्तिरसात चिंब झालेले गणेशभक्त… ढोलताशांचा गजर… अशा भारावलेल्या वातावरणात सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आज (सोमवार) पिंपरी-चिंचवड मध्ये आगमन झाले. सकाळपासूनच गणरायाच्या स्वागतासाठी घरोघरी लगबग दिसून आली. मुहूर्तावर गणेशमूर्ती आणण्यासाठी गणेशभक्तांनी गणपती स्टॉलवर गर्दी केली होती.     

बाप्पांना घरी नेण्यासाठी  दुपारी १ वाजेपर्यंत चित्रशाळांबाहेर  भाविकांची झुंबड उडाली  होती. बच्चेकंपनीही नटून-थटून लाडक्या बाप्पाला आणण्यासाठी आतुर असल्याचे दिसून आले. ‘गणपती बाप्पा मोरया’ची बँड डोक्याला बांधून लहान मुले आपल्या पालकाबरोबर आली होती. मोठ्या उत्साहात, जल्लोषात गणेश भक्तांकडून श्रींची मूर्ती घरी नेली जात होती.  गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी घराघरात धांदल  सुरू होती. पारंपरिक वेश परिधान करून भाविक गणरायाची मूर्ती घेऊन जाताना दिसत होते. गणरायाला घरी नेताना महिला वर्गांचाही उत्साह ओसांडून वाहत होता.

सार्वजनिक मंडळांनी झांजा-ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने गणेशमूर्ती नेल्या.  आरास सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी  बाजारपेठामध्येही मोठी गर्दी दिसून आली. तर  मिठाईच्या दुकानांमध्ये  रांगा लागल्या होत्या. खव्याचे मोदक, उकडीचे मोदक खरेदी करण्यास लोकांकडून पसंती मिळत होती. गणरायाच्या पूजेसाठी, तसेच सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी लोकांनी केली.   फळे, फुले यांचीही बाजारात रेलचेल दिसत होती. थेरगांव, चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, निगडी, भोसरी येथील बाजारपेठां गर्दीने फुलून गेल्या होत्या.

घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात  गणरायाचे ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत आगमन झाले.  त्यानंतर गणपतीची मुहूर्तावर विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.  गणरायाच्या आगमनामुळे  येथून पुढे ११ दिवस शहरात मांगल्य, चैतन्याचे वातावरण असणार आहे.  बाप्पांची दीड दिवस,  पाच दिवस, सात दिवस ते अनंत चतुर्दशीपर्यंत पारंपरिक पध्दतीने गणेशभक्तांकडून मनोभावे पूजा केली जाणार आहे.